नांदेड| मुलाचे पुढील शिक्षणासाठी अनुसूचीत जातीची जात पडताळणी होऊन वैधता प्रमाणपत्र मिळणेकामी १५ हजारांची लाच घेणाऱ्या सुजाता मधुकरराव पोहरे, जिल्हा प्रकल्प अधिकारी (कंत्राटी), समतादुत प्रकल्प, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) नांदेड याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले (In Nanded, public servant Sujata Pohere accepted a bribe ) आहे. या कार्यवाहीची नांदेड जिल्ह्यात लाच दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही हे सिद्ध झाले आहे.


यातील तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे पुढील शिक्षणासाठी अनुसूचीत जातीची जात पडताळणी होऊन वैधता प्रमाणपत्र मिळणेकामी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्याकडे ऑनलाइन अर्ज केला होता. यासाठी दिनांक 13 मार्च 2025 रोजी ऑफलाइन देखील अर्ज केला होता. परंतु तो काही तांत्रिक कारणास्तव नामंजूर करण्यात आला होता. तक्रारदार यांनी पुन्हा त्यांचे मुलाचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर यातील आरोपी लोकसेविका सुजाता पोहरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी तक्रारदार यांना सांगितले की, मी काम करीत असलेल्या विभागाचे शेजारीच जात पडताळणी विभागाचे काम चालते. तेथे माझी ओळख असून, मी तुझे काम करून देते. परंतु पैसे भरल्याशिवाय काम होणार नाही. तुम्ही 20,000/- रूपये टोकन रक्कम दिल्यास तुमचे काम होईल अन्यथा काम होणार नाही अशा आशयाची तक्रार दिनांक 26 जून 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दिली होती.

त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी दिनांक 03 जुलै 2025 रोजी समाज कल्याण कार्यालय, नांदेड परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) नांदेड येथील लोकसेविका सुजाता पोहरे यांचे कक्षात पंचासमक्ष केली. यातील लोकसेविका यांनी तक्रारदार यांच्या मुलाची अनुसूचीत जातीची जात पडताळणी होऊन जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता एकूण 30,000/- रूपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती सुरूवातीस 15,000/- रूपये व उर्वरीत रक्कम 15,000/- रूपये जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम झाल्यानंतर द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली.

त्यावरून दिनांक 03/07/2025 रोजी समाज कल्याण कार्यालय, नांदेड परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) नांदेड येथील लोकसेविका सुजाता पोहरे यांचे कक्षात सापळा कार्यवाही करण्यात आली असून, लोकसेविका सुजाता पोहेरे यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम 15,000/- रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारली. यावेळी आरोपीचे अंग झडतीमध्ये लोकसेविका यांचे ताब्यात एक विवो कंपनीचा T4 कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम 50 रूपये मिळून आले. मोबाईल तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे.

या कार्यवाहीसहा आरोपी लोकसेविका सुजाता पोहरे यांचे हडको, नांदेड येथील राहते घराची घरझडती सुरू आहे. लोकसेविका सुजाता पोहरे यांचेविरुद्ध पो.स्टे. विमानतळ, ता. जि. नांदेड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसेविका यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.
हि सापळा कार्यवाही करीम खान पठाण, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी
मपोहेकाॅ.मेनका पवार, पोेकाॅ. यशवंत दाबनवाड, पोेकाॅ. ईश्वर जाधव, चापोहेकाॅ, रमेश नामपल्ले सर्व नेमनुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी केली. यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र,नांदेड, डॉ.संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र,नांदेड, पर्यवेक्षण अधिकारी, प्रशांत पवार, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि.नांदेड, 93590 56840 यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कार्यवाहीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले कि, कुणी शासकीय कामासाठी लाच मागत असल्यास याबाबतची तक्रार दूरध्वनी 02462 253512 , टोल फ्री १०६४, व्हॉट्सअप नंबर 9359056840 वर करावी.