लातूर/मुंबई| लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमआरआय आणि
सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून दिले जाईल, (MRI and CT scan machines will be available immediately) असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना दिले आहे.


महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई येथे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज गुरुवार दि. ३ जुलै २५ रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन मागच्या अडीच वर्षापासून बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे सामान्य परिस्थितीतील रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता खाजगी भागीदारीतुन या मशीन उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय घेतला आहे, याचे कारण काय? या अत्यंत महत्त्वाच्या सुविधेसाठी शासनाकडे पैसा नाही का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सामान्य परिस्थितीतील रुग्ण उपचारासाठी येतात त्यामुळे एमआरआय आणि सिटीस्कॅन मशीन खरेदीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी लावून धरली.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खाजगी भागीदारीची बाब मान्य केली परंतु लातूर येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर एमआरआय आणि सिटीस्कॅन मशीन
उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या चर्चेत हस्तक्षेप करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या मशीन खरेदीसाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देण्याची सूचना, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.अजित पवार यांना केली. त्यानीही ती सूचना मान्य करीत याकामी ताबडतोब निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
