नांदेड, अनिल मादसवार। लोकसभा निवडणुकीमध्ये जीवाचे रान करून उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे हे हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. असे सुतोवाच खुद्द सुभाष वानखेडे यांनी नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना केले आहे. मला लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहण्याची संधी आली होती. मात्र मी उद्धव साहेबांना विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. हदगाव विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे मी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे ते म्हणाले. वानखेडेंच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या हदगाव मतदार संघातील नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली असून, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरतो कि..? उमेदवारीसाठी स्वबळावर निवडणूक लढविल्या जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणूक संपताच विधानसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजेल असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार आपापल्या क्षेत्रात तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत आजी-माजी नेत्यांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सुभाष वानखेडे यांनी पक्षाच्या विरोधात कामे केल्याचा ठपका ठेवला आहे. तर माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी जर आम्ही काम केलं नाहीतर हिंगोलीची सीट निवडून आली कशी..? असा प्रतिप्रश्न उपस्थित करून आरोप प्रत्यारोप होत असतात असे म्हणून यावर पडदा टाकला आहे.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तीन वेळा हदगाव विधानसभेचे आमदार म्हणून काम केलेले तथा हिंगोलीचे माजी आमदार सुभाष वानखेडे हे देखील महाविकास आघाडी कडून हदगाव विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार आहेत. असे असले तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी म्हणतील त्या ठिकाणाहून मी निवडणूक लढवणार असून, हदगाव विधानसभा शिवसेनेला सोडून घेण्यासाठीची विनंती मी पक्षप्रमख उद्धव साहेबांकडे करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे हदगाव विधानसभा कोणत्या पक्षाला सुटेल हे सांगणे साध्यतरी अवघड आहे. जर हि जागा बदलली गेली तर बंडखोरी होईल किंवा इच्छुक उमेदवार इतर पक्षात पक्षांतर करून निवडणूक लढवतील असे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नुकतेच भाजप पक्षामध्ये दहा वर्ष काम करून पुन्हा स्वगृही परतलेल्या माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजे शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेश म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचे मानले जात आहे. त्या हदगाव विधासभेतील वायफना गावच्या रहिवाशी आहेत. भाजपमध्ये असताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात हदगाव – हिमायतनगर मतदार संघ पिंजून काढून महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर याना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि मतदार संघात मताधिक्य मिळवून दिले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना सूर्यकांताताई पाटील यांनी मी आगामी हदगाव विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे संगितले होते. सूर्यकांताताई पाटील ह्या हदगाव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सोडून घेण्यासाठी पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे आग्रह धरतील..? असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


असे झाले तर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते सुभाष वानखेडे यांना दुसरा मतदार संघातून निवडणूक लढवावी लागणार आहे. म्हणून महाविकास आघाडीकडून हदगाव विधानसभा मतदार संघ आपल्या पक्षाला सोडून घेण्यासाठी सर्वच इच्छुकांनी आपापली तयारी केली आहे. जर हदगाव विधानसभेची जागा बदलल्या गेली तर काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना हदगाव विधानसभा निवडणूक लढवायची असंल्यास अन्य पक्षात प्रवेश करून आपले नशीब आजमावे लागणार आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामाध्यमातून ते भाजपा पक्षात प्रवेश करू शकतात..? असेही राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. एकूणच हदगाव विधानसभेचे राजकीय गणित पाहता हदगाव मतदार संघ आपल्या पक्षाला सुटावा यासाठी रस्सीखेच करावी लागणार असून, यातून नाराज झालेल्याकडून विधानसभा निवडणुकीत एकमेकाला हात दाखविण्यासाठी कट -शहकटाचे राजकीय डावपेच खेळले जाईल असे चित्र सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येत आहे.
तसेच महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढविलेले शिंदे सेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर हे देखील हदगाव विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार आहेत. यासाठी त्यांनी मतदार संघात भेटी गाठी दौरे वाढविलें असून, विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्र्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ते विकास कामासाठी निधी आणण्यात अग्रेसर असल्याने सध्या त्यांचीच चर्चा विधानसभा मतदार संघात सुरु आहे. आत्तापर्यंत दोन वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बाबुराव कदम यांना यावेळी जनतेची साथ नक्कीच मिळे अशी अशा आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना विधानसभा मतदार संघातून विजयी उमेदवारापेक्षा केवळ १६०० मते कमी होती. हि त्यांच्यासाठी जमेची बाजू असून, विधानसभा निवडणुकीत ते उमेदवार म्हणून उतरल्यास जनतेची साथ मिळण्याची शक्यता अधिक आहे.

