हिमायतनगर,अनिल मादसवार| नगरपंचायतीत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक १७ मधील फुलेनगरच्या रहिवाश्याना मागील 30 ते 35 वर्षापासुन हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागतो आहे. येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची घरे जिर्न झाली असून, प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेली घरे बांधण्यासाठी नगरपंचायतीकडुन बाधंकाम परवानगी व नमुना नंबर 43 चे प्रमाणपत्र देण्यास चालढकल केली जात आहे. जागेचे मालकी हक्क प्रमाणपत्र देऊन घरकुलाचा लाभ द्यावा यासह इतर मागणीसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून फुलेनगरच्या नागरिकांनी अमरण उपोषण सुरु केले आहे. या अमरण उपोषनाला आज शेकडो महिला पुरुषांनी चुलबंद ठेऊन पाठिंबा (Hundreds of men and women supported the Amaran Uposhan) दिला असून, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. असा इशारा उपोषणकर्ते सुभाष दारवंडे, मोहम्मद इम्तियाज खान यांच्यासह शेकडो नागरिकांनी दिला आहे.

हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्र. १७ मध्ये असलेल्या फुलेनगर वस्तीत सन १९८७-८८ या काळात बेघर भूमिहिन घरकुल योजनेनुसार घरे बांधुन देण्यात आली होती. सदर कच्चा मातीची घरे या काळात जिर्ण झालेली असून, तेथे ३० वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरे मंजुर झालेली आहेत. सर्व लाभार्थी घर बांधण्यास इच्छुक असून देखील काही अनावश्यक कारणामुळे फुलेनगर येथील लाभार्थ्याना नगरपंचायतीकडून घरकुल बांधकाम करण्याकरीता परवानगी मिळत नाही. तेथील नागरीकांना घर बांधणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र लाभार्थ्यांना ४३ नंबरचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण समोर करून शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे.

या नागरीकांच्या घरांची नगरपंचायत तर्फे कर आकारणी करुन प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुलाचे बांधकामासाठी परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले असताना हिमायतनगर नगरपंचायतीकडून अंमलबजावणी न करता चालढकल करत आहे. यासाठी नागरिकांनी अनेकदा वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा केला मात्र नगरपंचायत प्रशांसनाकडून जिल्हाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप करत फुलेनगर येथील उपोषणकर्ते सुभाष दारवंडे, मोहम्मद इम्तियाज खान, जाहीर मिर्झा, शेख रशीद, शेख शब्बीर, शेख फयाज आदि नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नगरपंचायतीच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात आमरण उपोषण सुरु केलं आहे. आज अमरण उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला असताना नगरपंचायतच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्याने उपोषणस्थळी साधी भेट दिली नाही.

त्यामुळे आज फुले नगर भागातील शेकडो महिला- पुरुष रहिवाश्यांनी चुलबंद करून आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नगरपंचायत येथे दाखल झाले होते. फुलेनगर ते हिमायतनगर नगरपंचायत हा एक किमीचा अंतर पायपीट करत रैली काढून येथील रहिवाश्यानी उपोषणाला पाठिंबा देऊन तात्काळ समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. उपोषणस्थळ ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर महिला – पुरुष नागरिकांची जमलेली गर्दी पाहून वहातुक विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांना रस्ता मोकळा करावा लागला आहे. आतातरी प्रशासनाने फुले नगर भागातील जनतेची मागणी लक्षात घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करावे लागेल असा इशारा उपोषणकर्त्यानी दिला आहे.
