नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित सुरु आसलेल्या हिमायतनगर ते बोरगडी रोडचे डांबरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकरी युवकांनी कामाचा दर्जा घटत असल्याने चक्क रस्ता उखडून निकृष्ट कामाची पोलखोल केली आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठेकेदाराने सदर रस्ता दर्जेदार करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्हा सीमा रस्ते दुरुस्ती योजना 2024 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते बोरगडी पर्यंत अंदाजे 6 किलोमीटरचे डांबरीकरणाचे काम गेल्या काही दिवसपासून चालू आहे. सदर काम शासकीय ठेकेदार एस. एस. पळशिकर हे करत असून, परंतु अंदाजपत्रकाप्रमाणे काम करीत नसल्याची तक्रार गावकरी युवक माधव बालाजी काईतवाड, लक्ष्मण बालाजी भैरेवाड रा. बोरगडी, ता. हिमायतनगर यांनी केली होती.
या कामात साईड भरामध्ये माती मिश्रित मुरूम टाकला जात आहे. तसेच या कामावर जुना रस्ता खोदून त्याचे मटेरियल्स नवीन रस्त्याच्या बांधकामाकरिता वापर करीत आहेत. त्याचबरोबर कामावर क्युरिंग करिता पाण्याचा वापर, दबई, लेवलिंग हे होत नसल्याचे तक्रारीत म्हंटले होते. आणि हे काम जलदगतीने न करता कासव गतीने करत असून, यामुळे या रस्त्यावर भीषण अपघात होत आहेत. या कामाची तात्काळ चौकशी करून, हे निकृष्ट होत असलेले काम थांबिवण्यात यावे. कामाची गुणवत्ता तपासणी गुण नियंत्रण कक्षामार्फत चौकशी करण्यात यावी गुत्तेदाराचे नाव काळ्यायादीत टाकून, चांगल्या गुत्तेदारा मार्फत रोडचे काम करून द्यावे अशी मागणी केली होती.
मात्र वरिष्ठानी या चौकशीच्या मागणीकडे अभियंत्यांकडून दुर्लक्ष करून ठेकेदाराला अभय दिले असल्याने ठेकेदारे गावकऱ्यांच्या व शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून डांबरीकरणाचे काम थातुर माथूर करण्यावर भर दिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर युवक गावकऱ्यांनी आज चक्क डांबरी रस्ता खोदून काढून गुत्तेदारच्या निकृष्ट कामाची पोलखोल केली. गावकरी युवकानी घेतलेल्या पावित्र्याचे दखल घेत गुत्तेदाराने जेवढा रस्ता खराब दिसतो तेवढा नव्याने करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गावकरी युवकांनी तूर्तास काम चांगले व दर्जेदार करून देण्याच्या मागणीवर ठाम असून, यानंतर तरी रस्त्याचे काम गुंवतापूर्ण करून दिले जाईल का..? याकडे बोरगाडी गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.