नांदेड/हिमायतनगर| येथील मुलींची होणारी छेडछाड लक्षात घेऊन दामिनी पथक स्थापन करण्यासंदर्भातील निवेदन देऊनही हिमायतनगर पोलिसांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे बोरी रोड येथील पैनगंगा नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा माधव किशन शिंदे यांनी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना निवेदनातून दिला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन मुली शिक्षणासाठी येतात. परंतु मागील काही दिवसांपासून रोड रोमिओ तसेच टवाळखोराकडून तरुणींना त्रास देण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे स्वराज्य पक्षाकडून दि.०१/०१/२०२५ रोजी पोलीस ठाणे हिमायतनगर यांच्याकडे निवेदन देऊन दामिनी पथक स्थापन करून, तरुणींची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली होती.

परंतु अद्यापही निवेदनाची दखल हिमायतनगर पोलिसांनी घेतली नसल्यामुळे, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी रविवारी सकाळी ठीक ०८:०० वाजता माधव किशन शिंदे, हिमायतनगर तालुक्यातील बोरी (बा.) रोड येथील पैनगंगा नदी पात्रामध्ये जलसमाधी घेत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनाच्या प्रति उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर, तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, हिमायतनगर, पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे हिमायतनगर दिल्या असून, यावर माधव किशन शिंदे स्वराज्य पक्ष, तालुका हिमायतनगर यांची स्वाक्षरी आहे.
