नांदेड| गेल्या पंधरा दिवसात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे आणि फळबागांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करा अशी मागणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे. आज मुंबईत आ. बोंढारकर यांनी ना. कोकाटे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

नांदेड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही या पावसाचा मोठा फटका बसला आहे . बेमोसमी पावसामुळे उन्हाळी पिकांना प्रचंड फटका बसला तर फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे शिवाय पशुधनही या दगावले आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच हवालदिल झाला आहे.

सततच्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, ज्वारी ,मका, बाजरी, आंबा , भुईमूग, हळद आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .अशा परिस्थितीत नैसर्गिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत यासाठी आदेशित करावे आणि पंचनामे सादर होताच शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आ. बोंढारकर यांनी केली आहे.



