श्रीक्षेत्र माळेगाव| जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून मागील वर्षीपासून सुरू झालेली कचरामुक्त माळेगाव यात्रा मोहीम यंदा देखील मोठ्या यशस्वीपणे राबवीली जात आहे. यात्रेतील स्वच्छता व कचरामुक्तीच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने पुढाकार घेत विशेष मोहीम हाती घेतली आहे.
दररोज सकाळी 5 वाजता व रात्री 11 वाजेदरम्यान यात्रेतील गर्दी कमी झाल्यानंतर सफाई कर्मचारी प्लास्टिक व इतर कचरा उचलत आहेत. यात्रेदरम्यान रस्ते, चौक, हॉटेल्स, वस्तू विक्री दुकान परिसरातही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायत टीमने कंबर कसली आहे.
या मोहिमेत सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे, उपसरपंच बालाजी नंदाने, ग्रामविकास अधिकारी बी. सी. देवकांबळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य सारजाबाई नारायण धुळगंडे, पारोजी वाघमारे, लक्ष्मीबाई गोविंदराव राठोड, बाबुराव वाघमारे, कांताबाई गुणाजी जोंधळे, लक्ष्मीबाई शिवाजी गौकौंडे, गोपाळ पाटील, मंजुळा संपत्ती वाघमारे, साहेबराव राठोड, लिपिक खंडू साखरे, बंडू वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, लक्ष्मण रायबोले, भुजंग वाघमारे ,आम्रपाली वाघमारे हे या मोहीमेसाठी यांनी पुढाकार घेतला. यात्रेकरूंनी स्वच्छतेला दिलेला पाठिंबा व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नामुळे कचरामुक्त माळेगाव ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे.
ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती
ट्रॅक्टरवरून ध्वनिक्षेपकाद्वारे यात्रेकरूंना कचरा टाकण्यासाठी आवाहन केले जात आहे. यात्रेकरु व व्यापारी यांनीही मोहिमेस भरभरून प्रतिसाद दिल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
माळेगाव यात्रेत फिरत्या शौचालयाची सुविधा
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोठया प्रमाणात स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून माळेगाव यात्रेतही यंदाही यात्रेकरुंना फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कंधार नगरपालिका, देगलूर नगरपालिका, धर्माबाद, उमरी व नायगाव नगरपालिकेचे फिरते शौचालयाव्दारे भाविकांना सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय माळेगाव यात्रा परिसरात यापूर्वीचे सामुहिक शौचालय देखील उपलब्ध आहेत. तसेच माळेगाव यात्रा निवास व परिसरात देखील महिला व पुरषांसाठी शौचालयाची व्यवस्था केलेली आहे.