नांदेड| मराठवाड्यातील ग्रामीण संस्कृती, शेती आणि ग्लोबलायझेशनच्या प्रभावावर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित ‘ग्लोबल आडगाव’ या मराठी चित्रपटाने महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये चार नामांकने मिळवत मोठे यश मिळवले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी साठाव्या राज्य चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली असून, या चित्रपटाने विविध नामांकने पटकावली आहेत.

चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी नामांकन मिळाले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट गीते (प्रशांत मडपुवार – यल्गार होऊ दे) आणि उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता (रोनक लांडगे) या विभागांत देखील ‘ग्लोबल आडगाव’ने स्थान मिळवले आहे.

मनोज कदम (निर्माता) आणि अमृत मराठे (सह-निर्माता) यांनी साकारलेल्या या चित्रपटाने याआधीच न्यू जर्सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल (अमेरिका), न्यूलीन लंडन बेस्ट रायटर अवॉर्ड, इफ्फी गोवा महोत्सव, कोलकाता फिल्म फेस्टिव्हल, अजंता-एलोरा फिल्म फेस्टिव्हल, पीफ फेस्टिव्हल, यशवंत फेस्टिव्हल अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सवांमध्ये आपली चमक दाखवली आहे.

चित्रपटात सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, रौनक लांडगे, सिद्धी काळे, अशोक कानगुडे, अनिल राठोड, महेंद्र खिल्लारे, साहेबराव पाटील, डॉ. संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे यांसारख्या दिग्गज कलाकारांसह 665 हून अधिक कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत. डॉ. विनायक पवार, प्रशांत मडपुवार आणि डॉ. अनिलकुमार साळवे यांनी गीतलेखन केले असून, जसराज जोशी, डॉ. गणेश चंदनशिवे आणि आदर्श शिंदे यांनी गाणी गायली आहेत. संगीतकार विजय गावंडे, सिनेमॅटोग्राफर गिरीश जांभळीकर, संकलन श्रीकांत चौधरी, निर्मिती व्यवस्थापक प्रशांत जठार, सागर पतंगे, कला दिग्दर्शन संदीप इनामके, तसेच गणेश नारायण आणि डॉ. सिद्धार्थ तायडे (सह-दिग्दर्शक) यांनी चित्रपटाची तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळली आहे.

ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली कोलमडणारी शेती यासारख्या गंभीर विषयांना स्पर्श करणारा ‘ग्लोबल आडगाव’ एप्रिल-मे 2025 मध्ये महाराष्ट्रासह अमेरिका, दुबई आणि अन्य ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने राज्य पुरस्कार नामांकन मिळवल्याने संपूर्ण मराठवाड्यात आनंदाचे वातावरण असून, ‘ग्लोबल आडगाव’ रुपेरी पडद्यावर कसा झळकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!