नांदेड| रेल्वे स्थानकावर अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पाणपोईसाठी अखेर जागा उपलब्ध झाली असून, धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून चंद्रकांत गंजेवार यांच्या सौजन्याने समर्पित करण्यात आलेल्या आरओ थंड जलसेवेचे लोकार्पण खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या हस्ते जल्लोषात पार पडले.


गेल्या चाळीस दिवसांपासून पाणपोईसाठी जागा मिळविण्याचा प्रयत्न चालू होता. या विषयावर प्रसार माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ जागा उपलब्ध करून दिली. प्रवाशांना केवळ थंडच नव्हे, तर शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आरओ सुद्धा बसविण्यात आला. ही सोय ॲड. दिलीप ठाकूर यांच्या तातडीच्या पुढाकारातून साकार झाली.

गोपछडे यांच्या हस्ते जलसेवेचे उद्घाटन,प्रवाशांना दिले पाणी
देवगिरी एक्सप्रेसने नांदेडात दाखल झाल्यानंतर खासदार गोपछडे यांचे ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. प्लॅटफॉर्म नंबर ४ वरून १ वर मिरवणूक काढण्यात आली. कै. केरबा माधव गंजेवार व कै. चंद्रभागाबाई केरबा गंजेवार यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत गंजेवार यांनी प्रदान केलेल्या वॉटर कुलरचे उद्घाटन खा. गोपछडे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर त्यांनी स्वतः एक बाटली भरून प्रवाशाला पाणी पाजले, ही बाब उपस्थितांच्या विशेष लक्षात राहिली.

भव्य उपस्थिती, गौरव आणि उदात्त विचारांची सरशी
या कार्यक्रमाला भाजपा उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, डीआरयुसी सदस्य अरविंद भारतीया, भाजपा उपाध्यक्ष मनोज जाधव, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा महादेवी मठपती, मंडल अध्यक्ष मारुती वाघ, उद्योजक संग्राम गीते, उद्योग आघाडीचे विशाल फाजगे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पार्सल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळराव माळगे व सचिव मारोतराव कुमार मोघेकर , शिवा लोट, संतोष भारती यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. याप्रसंगी बोलताना खा. गोपछडे यांनी दिलीप ठाकूर यांच्या उपक्रमशीलतेचे तसेच चंद्रकांत गंजेवार यांच्या दानशूरतेचे मनापासून कौतुक केले. प्रवीण साले यांनीही मनोगत व्यक्त केले.

कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार, सीसीटीव्ही लावण्याचे आश्वासन
या उपक्रमासाठी तांत्रिक सहाय्य करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांचा खासदार गोपछडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात सीनियर सेक्शन इंजिनियर कपिल थोरात, स्टेशन मॅनेजर आशुतोष कुमार, मुख्य वाणिज्य निरीक्षक संजीव कुमार, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रेमसिंह मीना, रेल पथ निरीक्षक संजय श्रीवास्तव, इलेक्ट्रिकल विभागाचे सीनियर इंजिनियर कुमार चंद्रहास यांचा समावेश होता.पाणपोईचे सुरळीत व सुरक्षित संचालन होण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याची मागणीही रेल्वे प्रशासनाकडून मान्य करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप ठाकूर, आभार शिवा लोट यांचे
कार्यक्रमाचे संयोजन आणि प्रास्ताविक ॲड. दिलीप ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन शिवा लोट यांनी केले. या कार्यक्रमाला प्रवीण कुलकर्णी, रमेश येरकलवार, भुजंग कसबे, विनायक ,साबेर पटेल, गणेश गावंडे, जनार्दन ऐडके , अभिषेक माळगे , नागराज, तेजस माळगे, योगेश कांबळे यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपानंतर चहापानाने करण्यात आले.
प्रवाशांसाठी मोफत थंड व शुद्ध जलसेवा उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे घडवून आणण्यात दिलीप ठाकूर यांचे मोलाचे योगदान अधोरेखित होत आहे.