gets B++ rating from NAAC : हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर नॅक कडून B++ दर्जा प्राप्त

हिमायतनगर| येथील मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी केंद्रीय ग्राम विकास राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील तसेच संस्थेचे सचिव मा. अरुण कुलकर्णी यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयास नॅक (NAAC) कडून नुकताच B++ (CGPA 2.77) असा प्रतिष्ठेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या, नॅक समन्वयक, सर्व प्राध्यापकवर्ग व कार्यालयीन कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांचे ही अभिनंदन केले.


महाविद्यालयाच्या द्वितीय सायकल नॅक मूल्यांकनाच्या कामासाठी प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम आणि नॅक समन्वयक डॉ. गजानन दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सात क्रायटेरियाचे कार्य जबाबदारीने प्राध्यापकांमध्ये विभागून दिले गेले. या सर्व क्रायटेरियाचे प्रमुख, सदस्य प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, तसेच आजी व माजी विद्यार्थी संघातील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्या असतांनाही आपला अमूल्य वेळ देऊन अत्यंत परिश्रमपूर्वक हे कार्य सिद्धीस नेले.


दि. १९ व २० मे २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने नॅक पिअर टीमची महाविद्यालयाला भेट झाली. या भेटीच्या वेळी आभासी संवाद (Virtual Interaction) सुरळीत पार पडावा यासाठी महाविद्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. पिअर टीमने मागवलेली सर्व कागदपत्रे पुराव्यासह सादर करण्यात आली, त्यामुळे महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीला योग्य तो न्याय मिळाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ऑनलाईन पद्धतीने नॅक ला सामोरे जाणारे हे पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. हे यश म्हणजे संस्थेच्या अध्यक्षा, सचिव, प्राचार्या, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या एकसंघ प्रयत्नांचे फलित आहे. या घवघवीत यशाबद्दल अनेक महाविद्यालयांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





