हिमायतनगर,अनिल मादसवार| नगरपंचायत अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे दिवसागणिक अपघात होत आहेत. सर्वच प्रभागातील रस्ते चिखलाने भरले असून, त्यामुळे निर्माण होणारे खड्डे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत. काल बुधवारी चिमुकल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणारी स्कूल ओमानी बस आणि एक बोलेरो जीप महात्मा फुले चौकातील चिखलमय रस्त्यावरील खड्ड्यामुळे घसरून फसल्याचा (Even after a little rain, mud and stench reign in Himayatnagar) प्रकार घडला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी या घटनेमुळे पालकांसह पादचारी नागरिक वाहनधारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



येथील नगरपंचायतीचा कारभार चालविणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्यातील खड्डे अधीकच वाढले आहेत. शहरात नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा नळयोजनेच्या नावाखाली तीन वर्षांपासून रस्तावर खड्डे खोदून ठेवलेली आहेत. आणि आता मोबाईल कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी अनेक ठिकाणी खड्डे केले आहेत. त्यामुळे अल्पसा पाऊस होताच सर्वत्र चिखल व दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपंचायत प्रशासनाला सूचना देऊनही रस्त्यांवरील खड्डे बुजविल्या जात नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ठीक ठिकाणी वाहने फसून बसत आहेत.त्यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याची दखल घेऊन नगरपंचायत प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने तातडीने दाखल घेऊन शहरातील चौकाचौकात रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी व्यापारी, वाहनधारक, नागरिकांमधून केली जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यात अपघात होऊन एखाद्यच जीव गेल्याशिवाय नगरपंचायत जागी होणार नाही का? असा संतापजनक सवाल नागरिक विचारू लागले आहेत.


शहरातील बहुतांश चौकात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडत आहेत. त्यामुळे अल्पसा पाऊस होताच शहरात दुर्गंधी सुटत असून, हिमायतनगर नागरपंचायतीला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आलेल्या मशिनी धूळखात पडून असल्याने ओला व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थित नियोजन होत नाही. त्यामुळे रस्त्यावरील कचरा थेट नाल्यात जाऊन नाल्या जाम होत आहेत. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येऊन खड्डेमय रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरून दुर्गंधी सुटत आहे. यामुळे शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.