नांदेड| जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात तब्बल 42 वर्षापूर्वी पुनर्वसन झालेल्या 35 पुनर्वसित गावांत स्मशानभूमीसाठी महसूल प्रशासनाने जमीन संपादित केली नाही . त्यामुळे बिलोली तालुक्यातील या 35 गावातील लोकांना अंत्यविधीसाठी चार-पाच किलोमिटर अंतरावरच्या जुन्या गावातील तत्कालीन स्मशान भूमीच्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. (Establish cemeteries in 35 rehabilitated villages in Biloli taluka) यासाठी चिखल पाण्यातून रस्ता काढत जावे लागत आहे. ग्रामस्थांना अनेक अडचणींना सहन कराव्या लागत आहेत.


तालुक्यातील टाकळी थडी, रामपूर थडी, कुंभारगाव ,केरूर, टाकळी खुर्द,व तळणी या सात गावात स्मशानभूमी नसल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृती कार्यक्रमात येथील स्मशानभूमीची व्यवस्था करण्याचे आदेश असताना ही महसूल विभागाने अंमलबजावणी केली नाही. गोदावरी किनाऱ्यावरील चिरली, टाकळी थडी, कोळगाव, गुजरी कवठा, मांजरा नदी किनाऱ्यावरील माचनूर, हुनगुंदा, येसगी, कारला बुद्रुक, गंजगाव, मानार नदी काठावरील दौलतापूर, गळेगाव, रामपूरथडी, बोरगाव थडी, चीटमोगरा, हिप्परगा थडी, थडी सावळी तर पोचमपाड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या बाबळी, गोळेगाव, अटकळी, खतगाव, बावलगाव, कारला खुर्द, लघूळ,आरळी,जिगळा यासह 35 गावांचे पुनर्वसन झाले आहे.

मात्र ४२ वर्षानंतरही येथे स्मशानभूमी उभारण्यात आली नसल्याने अनंत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे संबंधित पुनर्वसित गावांमध्ये तातडीने स्मशान भूमी उभारण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी खा. डॉ. गोपछडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे . या अनुषंगाने यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेऊन जमीन अधिग्रहित केली पाहिजे. सोबतच स्मशानभूमीचे निर्माण कार्य सुरु करावे असे आदेश संबंधित विभागांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच पुनर्वसित गावातील स्मशान भूमीचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला आहे.
