किनवट, परमेश्वर पेशवे। शेताकडे जाणाऱ्या वयोवृध्द पती-पत्नीला भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात टेंपो ने उडवल्याने वयोवृद्ध पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना किनवट ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सावरगाव येथे दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हि घटना घडली.
या घटनेची माहिती सावरगाव येथील शेषराव पाटील, व माधवराव डोखळे व पत्रकार प्रेम जाधव यांनी इस्लापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी वेळेवर दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व येथील नागरिकांनी किनवट राष्ट्रीय महामार्गावर या अपघातात मृत पावलेले दोन्ही मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर आणून ठेवले आणि रास्ता रोको आंदोलन केले.
या भीषण धडकेत मृत पावलेल्या नागोराव संभाजी कुरुडे वय 65 वर्ष व निलाबाई नागोराव कुरूडे वय 60 वर्ष हे दोघेही सावरगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. तब्बल हा रास्ता रोको दोन तास चालल्याने अनेक वाहनांना रोडवर ताटकळ बसावे लागले. येथील संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व नागरिकांनी पोलिसांना वेळेवर माहिती देऊनही पोलीस वेळेवर पोहोचले नसल्याने येथील नागरिकांनी पोलीसावर रोष व्यक्त करत जोपर्यंत आरोपीला तुम्ही पकडणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही असा सवाल करत हा रास्ता रोको आंदोलन केला होता.
काही वेळानंतर नातेवाईकांनी समजूतदार पणा घेत आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी इस्लापूर पोलिसाकडे केली असता तेथील सा.पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. सदरील मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले मात्र पाच वाजेपर्यंत या अपघाताविषयी कुठलेही गुन्हे दाखल झाले नव्हते.