Rain with gusty winds ; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड। प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 06 जून 2025 रोजी दुपारी 12:46 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 06, 08 व 09 जून 2025 या तीन दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


या गोष्टी करा – विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये ‘दामिनी’, ‘सचेत’ हे दोन ॲप डाउनलोड करा ‘दामिनी’ ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर ‘सचेत’ ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते.

या गोष्टी करु नका – आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


आता फळपिक विमा योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहारामध्ये अधिसुचित फळपिकांसाठी सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राज्यात राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी सद्यस्थितीत सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) अनिवार्य असल्याचे परिपत्रक राज्याच्या कृषी विभागाने नुकतेच निर्गमीत केले आहे.
11 एप्रिल, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आइडी यापूर्वीच (15 एप्रिल 2025 पासून ) अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन 2025-26 मध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) बंधनकारक करण्यात आला आहे.
शेती आणि शेती विकासाच्या विविध योजनांचा लाभ आता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.). असल्याशिवाय मिळणार नाही. त्यामुळे जिल्हयातील सर्व शेतक-यांनी जवळच्या सीएससी , आपले सरकार केंद्रावर जावून अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत नोंदणी करुन शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



