मुंबई| महाराष्ट्र राज्यात मंजिल पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत 1 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.


| उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात | 10 नोव्हेंबर 2025 |
| उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत | 17 नोव्हेंबर 2025 |
| उमेदवारी अर्जांची पडताळणी | 18 नोव्हेंबर 2025 |
| अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत | 21 नोव्हेंबर 2025 |
| अपिल असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत | 25 नोव्हेंबर 2025 |
| निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर | 26 नोव्हेंबर 2025 |
| मतदानाचा दिवस | 2 डिसेंबर 2025 |
| मतमोजणी | 3 डिसेंबर 2025 |
| शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस | 10 डिसेंबर 2025 |
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणी देखील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही.


आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आजच दोन स्वतंत्र स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.


नगरपंचायतीत 1 सदस्य व 1 अध्यक्ष असतो. त्यामुळे त्यात मतदारांना दोन मते द्यावी लागतील. नामनिर्देशन हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. आयोगाने यासंबंधी एक पोर्टल तयार केले आहे. उमेदवारांना त्यावर आपले अर्ज भरता येतील. एका प्रभागात एका उमेदवाराला अधिकाधिक 4 उमेदवारी अर्ज भरता येतील. संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन जमा करावी लागेल. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. पण ज्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती सादर करून आपला अर्ज भरता येईल.




