हिमायतनगर,अनिल मादसवार। महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्याचे औचित्य साधून गुरुवारी दिनांक 10 रोजी रात्री “संघम शरणम गच्छामि” हे महानाट्य सादर करण्यात आले. या नाटय प्रयोगाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा हिमायतनगर यांच्यातर्फे करण्यात आले होते.



तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील कलावंतांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवास उजागर करणारे “संघम शरणम गच्छामि” या नाट्याचे आत्तापर्यंत 800 प्रयोग सादर केले असून, आता महाराष्ट्रात प्रयोग सादर करण्यात येत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून हिमायतनगर येथील जुनी नगरपंचायत समोरील मैदानात महानाट्य कार्यक्रमाचे सादरीकरण गुरुवारी रात्री करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे “संघम शरणम गच्छामि” हा पहिला यशस्वी नाट्यप्रयोग ठरला आहे.



हिमायतनगर शहरातील सार्वजनिक भीम जयंती उत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 4 दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. दिनांक 10 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्ष वर आधारित महानाट्य सादर करण्यात आले, यास बौद्ध उपासक उपसीका व विद्यार्थ्यांनी मोठी उपस्थिती लावली होती. आज दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती व अभिवादन सोहळा, दि. १२ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीत गायन स्पर्धा तर दि. १३ एप्रिल सायंकाळी भीमस्मृर्ती धम्म ज्ञान चाचणी होणार आहे.



तसेच दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नालंदा बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजारोहन सामूहिक त्रिशरण पंचशील होईल व तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैलचित्राची शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवारी सादर करण्यात आलेल्या महानाट्य कार्यक्रमाचे उद्घाटक नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटक तथा तालुकाध्यक्ष प्रशांत ठमके यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर आधारित महानाट्यातील कलावंतांनी उपस्थितांना दोन तास मंत्रमुग्ध केले. अनेकांनी महानाट्यात सहभागी कलावंतांच्या अप्रतिम सादरीकरनाचं अभिनंदन करत भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उत्तम कानींदे सर यांनी केले तर उपस्तीताचं आभार हनवते सर यांनी मानले.



