नवीन नांदेड| नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्ग वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिडको नांदेड येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने होत असलेल्या ओव्हर ब्रिजमुळे आंबेडकर चौकात पाडकाम व खोदकाम केल्यामुळे हा वाहतूक रस्ता नादुरुस्त झाला.


परिणामी अनेक वाहन धारकासह नागरीकांना त्रास सहन सोसावा लागत असल्याने माजी नगरसेविका सौ.वैजयंती भिमराव गायकवाड, ठाकरे शिवसेना गटाचे सिडको शहर संघटक प्रमोद मैड यांनी १ जुलै पासून आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. या अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व संबंधित विभागाच्या अधिकारी आंदोलन कर्ते यांच्यात झालेल्या बैठकी नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असून रस्ता ११ जुलै रोजी डांबरीकरण काम करण्यात आले. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.


नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नांदेड वरून सिडको कडे व वसरणी मार्ग जाणारी येणारी वाहतूक चारचाकी,दुचाकी,तिनचाकी वाहन संख्या मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी होत असलेल्या उड्डाण पुलामुळे तात्पुरता व वाहतूक रस्ता नादुरुस्त झाल्याने व पावसाळ्यात चिखल झाल्याने वाहनधारक मार्गक्रमण करतांना अनेक समस्यांना तोड दयावे लागले होते तर दुचाकी धारक अनेक जण या चिखलात पडले होते.


या ठिकाणी कायम स्वरूपी डांबरीकरण रस्ता दोन्ही बाजूंनी करण्यात यावा यासाठी १ जुलै पासून आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता,अखेर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या उपस्थितीत २९ जुन रोजी डॉ.आंबेडकर चौकामध्ये प्रत्यक्ष येऊन परिस्थीतीची पाहणी केली. सामाजिक कार्यकर्ते भि. ना. गायकवाड,सिडको शिवसेना ( ठाकरे ) शहर संघटक प्रमोद मैड, काँग्रेसचे जिल्हा सचिव किशनराव रावनगावकर उपस्थिती बैठक झाली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ११ जुलै पासून डॉ.आंबेडकर चौकातील चारही दिशेने रोड डांबरीकरणाचे काम सुरू केल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.



