नांदेड l दि. २१ जानेवारी रोजी माहूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शेतकरी निवास मैदानामध्ये निराधारांचा भव्य मेळावा घेण्यात आला.

हा मेळावा सीटूच्या जिल्हा उपाध्यक्षा कॉ.शिलाताई ठाकुर यांच्या पुढाकारातून यशस्वी झाला तर अखिल भारतीय किसान सभेचे नेते तथा माकप जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम आणि माहूर तालुका सचिव कॉ.किशोर पवार यांनी या मेळाव्यास संबोधित केले.

माहूर शहरातील व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होत्या. यावेळी सामूहिक चर्चा करण्यात आली असून महिलांनी अनेक समस्या येथे मांडल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, दिव्यांगा साठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, निराधारांचे मागील थकीत मानधन आदी प्रमुख ज्वलंत विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

लाडक्या बहिणीचे थकीत मानधन महिन्याच्या ७ तारखेच्या आत देण्यात यावे ही मागणी देखील जोर धरीत आहे. तसेच लाडक्या बहिणीचे मानधनात वाढ करून द्यावे आणि निराधारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन करण्यात यावे ही मागणी देखील पुढे आली आहे.

निराधार पीडितांचा अंत पाहू नये व वेळेवर मानधन वाटप करण्यात यावे. ह्या मागण्यासाठी लवकरच माहूर तहसील आणि जिल्हा कचेरीवर धडक देण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला.
शेतकरी नेते कॉ.शंकर सिडाम या मेळाव्यास संबोधित करतांना म्हणाले की, पीडित निराधार, दिव्यांग व कष्टकरी गोरगरीब लोकांना न्याय देण्यास सत्ताधारी सरकार पूर्णता अपयशी ठरले असून लवकरच मोठ्या ताकदीने सरकारच्या विरोधात मोर्चा काढून सर्वांच्या मागण्या शासनाकडे करण्यात येतील आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही.
यावेळी कॉ.किशोर पवार यांनी देखील राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली असून ते म्हणाले पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या महायुतिच्या निर्लज्ज सरकारणे स्वतःचे निवडणुकीतील जाहीरनामे विसरू नयेत व या सुकलेल्या चेहऱ्याच्या गरीब मायबाप जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा लाल बावटा तीव्र संघर्ष केल्या शिवाय थांबणार नाही.
सीटू कामगार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा कॉ.शिलाताई ठाकूर यांनी देखील आपले मनोगत या मेळाव्यात व्यक्त केले असून त्या म्हणाल्या जोपर्यंत निराधार बंधू भगिनींचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत सीटू व माकप शांत बसणार नाही असा इशारा प्रशासनास त्यांनी दिला.
पुढील दिशा लवकरच निश्चित करून व्यापक लढा लढून जिंकण्याचा निर्धार या यल्गार मेळाव्यात करण्यात आला असून निराधारांचा यल्गार कॉम्रेड लोकांच्या साथीने लढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.
कॉ.किशोर पवार, माकप तालुका सचिव माहूर