श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| ग्रामपंचायत म्हणजे छोट्या,मोठ्या गावखेड्याचा कारभार पाहणारी ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था या ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने पाहिला जातो व ग्रामसेवक हा शासन व जनतेतील महत्वाचा दुवा असतो. परंतू सद्यस्थितीत ग्रामसेवक हा ग्राम सेवक या शब्दातील सेवक या शब्दाचा अर्थ विसरला असल्याचा अनुभव सध्या माहूर तालुक्यात येत आहे. घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैस्याची मागणी करून (Demand for money for availing the benefits of Gharkul Yojana) गरिबांना डावलून श्रीमंताला घरकुलाचा लाभ दिला जात असल्याचे आता पुढे येऊ लागले आहे.

तालुक्यातील गावखेड्यात असे काही ग्रामसेवक व त्यांच्या मागे चाटुगिरी करीत असलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या प्रतिनिधीने धुमाकूळ घातला असून गोरगरीब व कष्टकरी लोकांना डावलून पैस्याच्या लालचेपोटी श्रीमंताच्या घशात घरकुलाचा लाभ घालत पैसा काढण्याचा सपाटा लावला असल्याची चर्चा आहे.याबाबत माहूरचे गटविकास अधीकारी सुरेश कांबळे याच्याकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व काही घरकुल योजनेपासून वंचीत असलेल्या लाभार्थ्यांनी तोंडी तक्रार केली असल्याची माहिती समोर येत आहे. गटविकास अधिकारी कांबळे ह्या गैरप्रकाराकडे जातीने लक्ष देवून त्या ग्रामसेवकाला व सदस्याच्या प्रतिनिधीला आवर घालतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्यांची पडके घरे आहेत आणि ज्यांना राहण्यासाठी छत नाही, अशा गोरगरिबांसाठी शासनाची प्रधानमंत्री घरकुल आवास योजना आहे. या योजनेअंतर्गत शासन १,३०,००० हजार अनुदान देते. कामानुसार टप्प्या टप्प्याने अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जात आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने ते अडचणीत आहेत. ऐवढेच नाही तर घरकुलाचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या लाभार्थ्यांना संपर्क करुण काही ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्याचे प्रतिनिधीत्व करणारे काही दलाल त्यांच्या अनुदानावर डल्ला मारीत असल्याचे प्रकरण पुढे येत आहे. माहूर तालुक्यात असे दलाल सक्रिय झाले असून यात काही ग्रामसेवक ही गोरखधंदा करीत असल्याची माहिती समोर येत आहे.तेव्हा “भीक नको पण कुत्र आवर” अशी म्हणण्याची वेळ आता घरकुल लाभार्थ्यांवर आली आहे.

गरीबांच्या टाळुवरील लोणी खाणार्या दलाला आवरा..!
काहींचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्याप मिळाले नसल्याने लाभार्थी मोठ्या अडचणीत सापडे असून, त्यांची चिंता वाढली आहे. थकलेले अनुदान मिळवून देण्यासाठी दलाल नव्याने कागदपञाची जुळवाजुळव करण्यासह अनुदान मिळवून देण्याच्या शर्तीवर लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करीत आहेत. “करा नाही तर मरा” या ब्रिद वाक्यानुसार लाभार्थी फसत आहेत. दलालांचा सपाटा, बांधकाम साहित्याच्या किमतीत वाढ, आणि पुढे उन्हाचा तडाका अशा चक्रव्यूहात लाभार्थी भरडला जात आहे. त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याकडे शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गरीबांच्या टाळुवरील लोणी खाणार्या दलालांवर आवर घालावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.