हाणेगाव| देगलूर तालुक्यातील एकदम सीमावृत्तीय टोकाला असलेल्या गुत्ती तांड्यातील (मानुर गन) अंगणवाडी व शाळा खोली बांधकामाच्या नमनालाच अर्थातच बेस सिमेंटलाच ‘ब्रेक ‘ देऊन कंत्राटदार दोन वर्षापासून गायब झाला.
विशेष म्हणजे एक पांढरपेशीय राजकीय पुढारी, संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदार या तीनसुत्रीय घटकांच्या ‘अभद्र ‘ युतीमुळे या कामाचे पूर्ण बिल हडप केल्याचा आरोप तांडा वस्ती मधील नागरिकांतून केला जात आहे. या बाबीकडे वरिष्ठ पातळीवर अनेकदा लेखी तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी देखील ‘अर्थपूर्ण ‘ दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. परिणामी अनेक चिमुकल्याना शिक्षणापासून वंचित राहण्याची नामुष्की ओढावल्याची विदारक परिस्थिती पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील गोगला गोविंद तांडा ग्रामपंचायत अंतर्गत गुत्ती तांडा (मानूर गन) या वस्तीमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळावे या उद्देशाने डीपीडीसी अंतर्गत 2022 मध्ये एक अंगणवाडी खोली व एक शाळा खोली असे दोन खोल्यांच्या बांधकामासाठी काही लक्ष मंजूर झाले होते. त्या अनुषंगाने कंत्राटदाराने दोन्ही खोल्यांचे बेस सिमेंट पर्यंत कसे – बसे बांधकाम करून उर्वरित काम तसेच अर्धवट सोडून पसार झाला.
दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी या कामाकडे ना गुत्तेदाराचे…. ना लोकप्रतिनिधीचे…. ना शाखा अभियंत्याचे…. लक्ष.. याचाच अर्थ कंत्राटदाराने या भागातील तत्कालीन काँग्रेस मधील व आता भाजपमधील एका राजकीय पांढरपेशी पुढाऱ्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना, शाखा अभियंत्यांना “लक्ष्मी” दर्शन देऊन सदरील कामाचा लाखो रुपयांचा निधी हडप केल्यामुळेच उपरोक्त खोलीचे बांधकाम सुरुवाती पासूनच रखडले गेले असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
याबाबत या भागाचे सामाजिक कार्यकर्ते श्रीराम गोविंदराव नागनपल्ले पाटील यांनी दि. 27 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाकडून पुढील उचित कार्यवाहीस्तव वर्ग करण्यात येत आहे .अशा आशयाचे एक पत्र पाठवून उपरोक्त दोन्हीही खोली बांधकाम निधी ‘ हडप ‘ प्रकरणाचे समर्थन… तरी …करीत.. नाही… ना ….! असा ही संशय या निमित्ताने तांड्यातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे… त्यामुळे या वस्ती मधील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ टेपली आहे.. या गंभीर बाबीकडे आयुक्त महोदयांनी लक्ष द्यावे अशी मागणी पुढे येत आहे.