हिमायतनगर, अनिल मादसवार| रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये अधिकाराचा गैरवापर करून, कागदपत्रांची हेराफेरी करून ग्रामस्थांची फसवणूक करणाऱ्या व ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान करणाऱ्या पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी सिरंजनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मेघा पवन करेवाड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले नांदेड, समाजकल्याण अधिकारी कार्यालय नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. त्यामुळे हिमायतनगर पंचायत समितीत चालणाऱ्यारा बोगस व घोटाळेबाज कारभार चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर पंचायत समिती कार्यालय गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे पत्र जावक क्रमांक पंसहि/बांध/3123 दि.06/12/2024 मध्ये नमूद केलेल्या पत्रानुसार हिमायतनगर तालुक्याला रमाई आवास योजना अंतर्गत 350 घरकुलाचे उद्दीष्टे प्राप्त झाले होते. त्यामुळे सिरंजनी मौजे सिरंजनी येथे दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी आयोजित ग्रामसभेत ठराव क्रमांक 07 नुसार रमाई आवास योजने अंतर्गत एकूण 44 पात्र लाभार्थ्यांची निवड व ग्रामसभेचा ठरावात केलेल्या 44 पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती कार्यालयात सरपंच ग्रामसेवकाने दाखल केली होती.


सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, नांदेड यांचे पत्र जावक क्रमांक सआसकनां/रमाईआवासयोजना/आदेश/2024-25/92 दि.11/03/2025 च्या पत्रानुसार नुसार, तत्कालीन गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर व कंत्राटी कर्मचारी ऑपरेटर यांनी संगणमत करून स्वतःचे आर्थिक हित जोपासण्याच्या उद्देशाने ग्रामसभेमध्ये निवड झालेली पात्र लाभार्थ्यांची यादी कागदपत्रांची हेराफेरी करून निवड झालेल्या लाभार्थ्यांची नावे अनुक्रमे सुदर्शन भगवान राऊत, कैलास दत्ता राऊत, रामा उकंडजी राऊत, विनोद विजय कोठेकर वगळून बेकायदेशीर रित्या इतर चार नावे यादीत समाविष्ट केली आहेत.


ग्रामसभेत निवडलेल्या लाभार्थ्यांची नावे वगळण्याचा संविधानिक अधिकार नसतांना केवळ अधिकाराचा गैरवापर करून कंत्राटी कर्मचारी यांनी ग्रामसभा ठरावात नसलेली बोगस नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी त्यांच्याकडून लाच घेतली. संबंधित गटविकास अधिकारी यांच्याशी संगणमत करून कागदपत्रांचा हेरफारी केची. तसेच ग्रामसभेने पात्र ठरवलेल्या सुदर्शन भगवान राऊत, कैलास दत्ता राऊत, रामा उकंडजी राऊत, विनोद विजय कोठेकर या लाभार्थ्यांची फसवणूक केली. आणि ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान केला. सदरील बाब अत्यंत गंभीर असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम सुरू असलेल्या घरकुलांच्या बाबतीत पैसे घेऊन बोगस फोटो अपलोड करून जुन्या घरावर बिले काढाण्याचा प्रकार सुद्धा सर्रासपणे चालू असल्याची मागील काळात होणारी चर्चा खरी ठरू लागली आहे. त्याचे सुद्धा काही ठळक पुरावे तक्रारीसोबत जोडण्यात आली असून, लाच न देणाऱ्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा त्यांची देयके थकून ठेवलेल्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत. हि बाब लक्षात घेता हिमायतनगर पंचायती समितीत कागदपत्रांची हेराफेरी करत अधिकाराचा गैरवापर करून सिरंजनी ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान करून पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी हेराफेरी केली आहे. संबंधित घोटाळेबाज, भ्रष्ट कंत्राटी कर्मचारी व गटविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सिरंजनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मेघा पवन करेवाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

