नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे सांडपाण्याचे शास्त्रशुध्द व्यवस्थापन करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 75 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सन 2021 पासून 450 केएलडी क्षमतेचा सिव्हेज ट्रीटमेंट प्लॉट एसटीपी कार्यान्वित आहे. हा एसटीपी प्लांट रुग्णालयातून येणाऱ्या सामान्य सांडपाण्याचे जैविक प्रक्रीयेद्वारे शुध्दीकरण करतो. त्याच्या मदतीने पर्यावरणपूरक पध्दतीने पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. तसेच पुनर्वापरासाठी पाणी उपलब्ध होते.

धोबीघाट, बायोमेडिकल वेस्ट साठवण क्षेत्र, ओटी कॉम्पलेक्स आणि प्रयोगशाळा यासारख्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रासायनिक व संसर्गजन्य सांडपाण्याच्या शुध्दीकरणासाठी स्वतंत्र ईटीपी आवश्यक असल्याचे एमपीसीबीच्या अहवालात नमुद करण्यात आले होते. त्यामुळेच बीएमडब्लुएम नियम 2016 नुसार नवीन यंत्रणा उभारण्याची प्रक्रीया राबवीली जात आहे. या ईटीपी मध्ये प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयक अशा तीन टप्प्यात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. उपचारीत पाण्याचा वापर फ्लशिंग, बागकाम आणि स्क्रबरसाठी केला जाऊ शकतो. तसेच उर्वरित पाणी सुरक्षितपणे निचऱ्यात सोडले जाईल.

रुग्णालयातून होणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे पर्यावरण रक्षण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे रुग्णालयाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल असे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच रुग्णालयातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या बाबींवर सातत्याने रुग्णालय प्रशासनाचे बारीक लक्ष असून यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना रुग्णालयात स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.

कोविड काळात सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट एसटीपी उभारणीसाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करुन मंजूरी मिळविली होती. त्याच धर्तीवर ईटीपी प्रकल्पासाठी प्रयत्न करुन हा प्रस्ताव मंजूरीपर्यत पोहोचविला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.