नांदेड l नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याने महायुतीला शतप्रतिशत कौल देऊन सर्वच उमेदवार विजयी केले आहेत. महायुतीकडून नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपाचे पाच, शिवसेनेचे तीन व राष्ट्रवादी पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची पुरती दाणादाण उडालेली आहे. २०१९ मध्ये नांदेड जिल्ह्यातून काँग्रेसचे चार आमदार निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हाती मोठा भोपळा आला आहे. महाविकास आघाडीचा एकही आमदार जिल्ह्यातून निवडून आला नाही. महायुतीकडून निवडून आलेल्या आमदारांना आता वेध लागले आहेत मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचे. नांदेड जिल्ह्यातून शिवसेनेकडून आमदार बालाजी कल्याणकर तसेच भाजपाकडून मुखेडचे आमदार तुषार राठोड, नायगावचे आमदार राजेश पवार, किनवटचे आमदार भीमराव केराम व राष्ट्रवादीकडून पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार प्रतापराव पाटील यांचे नाव चर्चीले जात आहे.
नांदेड जिल्ह्यातून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर किंवा राज्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का ? याबाबत नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे.
२०१९ मध्ये ध्यानीमनी नसताना तत्कालीन नगरसेवक बालाजी कल्याणकर यांना शिवसेनेकडून नांदेड उत्तर मधून उमेदवारी देण्यात आली व या संधीचे त्यांनी सोने केले. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी नांदेड उत्तरचा विकासाचा चेहरामोहरा बदलवून टाकण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले. त्या विकास कामांची पावती त्यांना 2024 च्या निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांच्या परड्यामध्ये भरभरून मते टाकून दिली. नांदेड जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी त्यांना खिंडीमध्ये पकडून त्यांच्या मार्गावर काटे पसरवण्याचे काम केले. तसेच काही नेत्यांनी त्यांच्यासोबत असल्याचे दाखवून निवडणुकीमध्ये यांच्या विरोधात काम केले असल्याचीही चर्चा शहरात होत आहे.
एकंदरीतच भविष्यामध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांचे नेतृत्व आपल्याला भारी पडू शकते, यासाठी त्यांना निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचे षडयंत्र नांदेड जिल्ह्यातील काही नेत्यांनी रचले होते. परंतु नांदेड उत्तरमधील बहाद्दर मतदारांनी त्यांचे हे षडयंत्र हाणून पाडले. नांदेड जिल्ह्यातून महायुतीच्या पारड्यात आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक जागा मतदारांनी निवडून दिले आहेत. त्यामुळे हा महायुतीचा ऐतिहासिक विजय मानला जातो त्यातही अंत्यत प्रतिष्ठेच्या असलेल्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विजय हा अनेक अर्थाने महत्वपूर्ण असल्याने त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुन्ना राठौर यांनी केली आहे