हिमायतनगर, अनिल मादसवार। भोकर ते हिमायतनगर अशी अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या एका भरधाव वेगतील जीपने दुचाकीला जबर धडक दिल्याची दुर्घटना दिनांक 26 रोज मंगळवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास घडली असून, या भयंकर अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार आहे. दिलीप खंडू डोखळे रा. पोटा बु.असे मयत युवकांचे नाव असून, जीपमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी देखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे जमादार सुधाकर कदम यांनी तातडीने भेट देऊन पंचनामा केला. या अपघाताच्या घनतेनंतर हिमायतनगर भोकर मार्गवरील अपघाताची मालिका कधी थांबणार..? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जातो आहे. तर अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे अशी मागणी वाहनधारक व नागरीकातून केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की धानोडा ते भोकर या राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर हीमायतनगर ते भोकर पर्यंत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील विविध फाट्यावरील चौकात स्पीड ब्रेकर लावून अपघात होणार नाहीत यासाठी संबंधित विभागाने लक्ष देणे क्रमप्राप्त होते. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील बहुतांश ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हिमायतनगर तालुक्यातील खडकी व टेंभी फाटा ते म्हसोबा नाल्याच्या मध्यभागात आत्तापर्यंत अनेक अपघात झाले. यामध्ये अनेकांना आपला जीव गमावा लागला तर काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे अनेकांनी अपघात होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष देऊन मुख्य चौक, ब्रिज आणि वळण रस्त्याच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली आहे.
मात्र अद्यापही या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्पीड ब्रेकर लावण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण थांबत नसल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार मंगळवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 7 वाजता हिमायतनगर येथून पोटा बु. गावाकडे दुचाकीवरून जात असताना एका युवकाचा अपघात घडला आहे. हिमायतनगर येथून दिलीप खंडू डोखळे रा. पोटा बु. हा २२ वर्षीय युवक गावाकडे दुचाकीवरून जात होता. दरम्यान खडकी फाटा ते म्हसोबा नाल्याजवळ येताच भोकर कडून हिमायतनगर येथे अवैध प्रवासी भरून घेऊन येणारी भरदार वेगातील जीप एका रेतीच्या ट्रैक्टराला ओव्हरटेक करून येत होती, जीपचालकांना समोरून येणाऱ्या दुचाकींचा अंदाज लागला नसल्याने दुचाकीला जबर धडक दिली.
या दुर्घटनेत युवक दिलीप खंडू डोखळे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर कोसळून जागीच मयत झाला. तर जीप मधील काही प्रवासी वर्ग किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही वाहने एवढ्या जोरात धडकली कि जीपच्या समोरील काचा चक्काचूर झाला असून, एकसाईडचा भाग चपटून गेला आहे. अपघात होताच जीप चालक फरार झाला असून, या ठिकाणी अपघातात जखमीं झालेल्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत युवकांच्या प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात रात्रीच आणले होते. सकाळी मयत युवकाच्या प्रेताचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे पोटा बु. गावावर शोककळा पसरली असून, युवकाच्या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपस पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर कदम व त्यांच्या सहकारी नारायण मेंडके हे करत आहेत.
अपघाताच्या घटनेनंतर किनवट ते हिमायतनगर पर्यंतच्या प्रत्येक मुख्य चौकात, वळण रस्त्याच्या ठिकाणी, बसस्टोप आणि गावाच्या फाट्यावर भविष्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ स्पीड ब्रेकर बसून भरधाव वेगतील वाहनांना अंकुश लावावा अशी मागणी वाहनधारक, सुजाण नागरिक व मयताच्या नातेवाईकांनी केली.