नांदेड| सिडको नवीन नांदेड भागात असलेल्या उद्यानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव देऊन सदरील पार्क महानगरपालिकेच्या रीतसर रेकॉर्डला लावून या पार्क परिसराला विकसित करावे अशी मागणी नवीन नांदेड सिडको भागातील समाज बांधवांच्या वतीने आयुक्त नांदेड महानगरपालिका यांना करण्यात आली आहे.
नवीन नांदेड भागात असलेले मुख्य उद्यान हे मागील अनेक वर्षापासून बंद अवस्थेत होते. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. तर काटेरी झुडपे व वाढलेले जंगल यामुळे या भागात विषारी साप व काही हिंस्र पशूंचा वावर वाढला होता. मागील अनेक वर्षापासून या उद्यानाला विकसित करावे अशी मागणी या भागातील नागरिकाकडून होत होती, मात्र नागरिकांच्या मागणीकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले. परिणामी या परिसरातील नागरिकांना अतोनात त्रासालास सामोरे जावे लागत होते.
अशात नवीन नांदेड भागातील सर्वच समाजातील नागरिकांनी या भागाची स्वच्छता करून या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पार्क उभारण्याचा संकल्प केला. हजारो नागरिकांनी एकत्रित येऊन या भागाची साफसफाई केली आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला. या ठिकाणी मागील वर्षभरापासून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून या सामाजिक उपक्रमांना हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहू लागले आहेत.
या भागातून एक मोठा नाला वाहत असून सदरील नाल्याची अनेक वर्षापासून दुरुस्ती न झाल्यामुळे सिडको भागातील सर्व घाण पाणी या परिसरात साचत आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाल्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर या उद्यानाला तात्काळ विकसित करून या परिसराचे सुशोभीकरण करावे व या परिसराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क असे नाव जाहीर करून ते महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर कायदेशीर घ्यावे अशी महत्त्वाची मागणी सिडको नवीन नांदेड भागातील समाज बांधवांच्या वतीने आयुक्त नांदेड वाघाळा महानगरपालिका यांना करण्यात आली आहे.
या निवेदनावर पी.एम. वाघमारे, विठ्ठल गायकवाड, डॉ. करुणाताई जमदाडे, भी. ना. गायकवाड, श्याम कांबळे, नरसिंग दरबारे, अनिल बेर्जे, अमृत नरंगलकर, साहेबराव भंडारे, अशोक मगरे, भीमराव बेरजे, पंडित सोनकांबळे, राजू जमदाडे, राघोजी वाघमारे, प्रदीप जोगदंड, विशाल जोंधळे, दिलीप लांडगे, यशपाल वाडे, संदीप महाबळे, अमरदीप हरणावळे, राजू वाघमारे, मोतीराम गायकवाड, नंदकुमार गच्चे, रमेश झगडे, मनोहर कोकरे, एस एस भंडारे, यु.के कांबळे, डी एन, गोधने, ॲड. जी. टी. ढगे, श्रीरंग मगरे विनोद लोखंडे, शिवाजी गोडबोले, गुरुचरण मस्के, राघोजी जोगदंड, केशव कांबळे, विजय भंडारे, भगवान जमदाडे, गौतम सोनसळे, शामराव कांबळे, दीपक सोनकांबळे, प्रवीण लांडगे, किशन वावळे, विलास ढवळे, हरी कसबे, बी. डी. कांबळे, सुरेश पवळे, साहेबराव ढवळे, भगवान जमदाडे आदीसह तब्बल 350 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.