देगलूर (गंगाधर मठवाले) तेलंगणा–महाराष्ट्र सीमेवरील असलेल्या देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर गावात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचा पारंपरिक बोडेम्मा सण उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.


या गावातील महिलांचे नातेवाईक व पाहुणे तेलंगणामध्ये असल्याने, तेथील सर्वात मोठ्या महिला उत्सवाच्या धर्तीवर शहापूर येथेही हा सोहळा रंगतो. पितृ अमावास्ये नंतरच्या दुसऱ्या दिवशी महिलांनी शिवारातून विविध प्रकारची फुले गोळा करून त्यांची सुंदर मांडणी केली.



संध्याकाळी गल्लीबोळांमधील महिला एकत्र होऊन तेलुगू व मराठी गाण्यांच्या तालावर पारंपरिक पावले खेळून बोडेम्मा सण साजरा केला. शेवटी गावालगत असलेल्या तलावात फुलांचे विसर्जन करून सर्वांनी एकत्र भोजन केले. या सोहळ्याला सगेसोयरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांच्या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. हा सण म्हणजे महिला मुलींसाठी आनंदाची पर्वणी होय.




