मुंबई| येत्या २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात (Maharashtra Public Service Commission Secretary Dr. Suvarna Kharat) यांनी केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. डॉ. खरात म्हणाल्या की, २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत.

सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा कोणत्याही माहितीमध्ये तथ्य नाही. काही भ्रमणध्वनी क्रमांकांवरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळवण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस आयुक्त, पुणे यांच्या तर्फे या प्रकरणी कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांना अशा प्रकारचे दूरध्वनी आल्यास, त्यांनी contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवावी.

महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी २ लाख ८६ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचेही डॉ. खरात यांनी सांगितले.