नांदेड| त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना निवेदन देण्यात आले.


20 सप्टेंबर 2025 रोजी (शनिवार) ‘झी 24 तास’चे ब्युरो चीफ योगेश खरे, ‘साम टीव्ही’चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, आणि ‘पुढारी न्यूज’चे ब्युरो चीफ किरण ताजने हे त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगमध्ये बातमी संकलनासाठी गेले होते. त्याचवेळी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर दगडफेक आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला.


या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे. पत्रकार हे समाजातील सत्य घटना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात.


अशा व्यक्तींवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय आहेत. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाच्यावीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी, सुनील जोशी, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम सावंत, कार्याध्यक्ष सुर्यकुमार यन्नावार, सहसचिव सुरेश आंबटवार, डॉ. भगवान सुर्यवंशी आदिंची उपस्थिती होती.



