मुक्रमाबाद/नांदेड| मुखेड तालुक्यातील हाळणी येथील शंकरअप्पा हेसे यांच्या घरात यावर्षी मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी मध्यरात्री ५ ब्रह्मकमळ उगवले असून जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात सलग पाच वेळा असे एकूण ११ ब्रह्मकमळ उगवले आहेत. मागील पाच वर्षापासून दरवर्षी सलग पाचव्यांदा हेसे यांच्या घरी ब्रह्मकमळ उमलत आहे.

यंदा गुरूवार दि.२५ जुलै रोजी मध्यरात्री पहिल्यांदा १ ब्रह्मकमळ, याच महिन्यातील शनिवार दि.२७ जुलै रोजी मध्यरात्री दुसऱ्यांदा १ ब्रह्मकमळ, शुक्रवार दि.०२ ऑगस्ट रोजी तिसऱ्यांदा २ ब्रह्मकमळ, शुक्रवार दि.०९ ऑगस्ट रोजी चौथ्यांदा २ ब्रह्मकमळ व मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी मध्यरात्री पाचव्यांदा ५ ब्रह्मकमळ असे एकूण ११ ब्रह्मकमळ हेसे यांच्या घरी उमलले असून, या उगवलेल्या ब्रह्मकमळाचे समस्त परिवाराने मनोभावे पूजन,आरती करून दर्शन घेतले.


ब्रह्मकमळ हे साधारणतः जुलै ते सप्टेंबर महिन्यात उगवते. पार्वती मातेच्या विनंतीवरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती असे शिवपुराणात म्हटले गेले आहे. ब्रह्मकमळ हे हिमालयाच्या पर्वत रांगेतील फुल आहे हे फुल पांढरं शुभ्र रंगाचे असते. धार्मिक दृष्टीने हे फूल भगवान विष्णूच्या नाभी पासून तयार झालेले आहे अशी मान्यता असून, त्यावर स्वयं ब्रम्हा विराजमान आहेत. उमलताना या ब्रह्मकमळामध्ये शंभू महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो. ब्रह्मकमळ या फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी वर्षभर वाट पहावी लागते. कारण इतर फुलाप्रमाणे हे फुल नेहमी उगवत नाही किंवा बाजारातही सहज उपलब्ध होत नाही. ब्रह्मकमळ हे दिसायला सुंदर, मनमोहक, ऐतिहासिक व पवित्र तसेच औषधीयुक्त फुल आहे. हाळणी येथील शंकरअप्पा हेसे यांच्या घरी उगवलेल्या ब्रह्मकमळाचे दर्शन घेण्यासाठी हाळणी सह परिसरातील भाविक नागरिकांनी हजेरी लावली.



