नांदेड| सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने होणाऱ्या चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. जगदीश कदम (Dr.Jagdish Kadam) यांचे ग्रामीण साहित्यात मोलाचे योगदान असून सप्तरंगी साहित्य मंडळाच्या राज्य कार्यकारिणीने डॉ. कदम यांची निवड करुन निवडीचे पत्र त्यांना दिले आहे.

यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, कवी गजानन हिंगमिरे यांची उपस्थिती होती. एकदीवसीय चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन २७ जानेवारी रोजी मुदखेड येथील रणछोडदास मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. डॉ. जगदीश कदम हे हदगाव तालुक्यातील रुई या गावचे असून ते नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.

विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील स्त्रीचित्रण हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. रास आणि गोंडर, झाडमाती, नामदेव शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर, ऐसी कळवाळ्याची जाती हे त्यांचे कवितासंग्रह. मुडदे ,आखर, मुक्कामाला फुटले पाय हे कथासंग्रह आहेत. गाडा, ओले मूळ भेदी या दोन कादंबऱ्या; बुडत्याचे पाय खोलात, वडगाव लाईव्ह हे नाटक, सहयात्री हे ललितगद्य, साहित्य: आकलन आणि आस्वाद हा समीक्षाग्रंथ, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गौतम बुद्ध ही चरित्रे तर गांधी समजून घेताना हा वैचारिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहे.

डॉ. कदम यांनी जवळजवळ सर्वच वाङमयप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यावर संपादन व संशोधन झालेले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा पुरस्कार त्यांच्या बुडत्याचे पाय खोलात या ग्रंथाला मिळाला आहे. भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, ना. धों. महानोर पुरस्कार अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती त्यांना मिळालेली आहे. अनेक ठिकाणच्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. असे एक प्रतिभासंपन्न कवी व लेखक जे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत ते सप्तरंगी साहित्य मंडळाच्या चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत.