
नांदेड| केळी उत्पादनाचा दर्जा व उत्पादकता वाढविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर मंजूर करण्याची मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत केली. (Approve banana tissue culture center in Nanded district – MLA Sreejaya Chavan’s demand in the Legislative Assembly)


भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ही मागणी केली. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. केळी उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले तर त्यांच्या उत्पादनात अधिक वाढ होईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. त्याला मान्यता देऊन आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. सदर टिश्यू कल्चर सेंटरच्या मागणीसाठी खा. अशोकराव चव्हाण यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह व राज्य शासनाकडे पाठपुरावा चालवला आहे, हे उल्लेखनीय.

आ. श्रीजया चव्हाण पुढे म्हणाल्या की, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जनजागृती व्हावी, महिला व बाल अत्याचाराला रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘मिशन निर्भया’ म्हणून एक उत्तम उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे नांदेड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नांदेडसाठी १२ पोलीस ठाण्यांचा समावेश असलेले पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली.


कृष्णूर ते मारतळा दरम्यान मारतळा, कुंभारगाव व कापशी परिसरात औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव शासनाला सादर झालेला आहे. नांदेडपासून अवघ्या १२ ते १५ किलोमीटरवरील या औद्योगिक वसाहतीसाठी उद्योजक आग्रही असून, याबाबतचा प्रस्ताव मान्य करून भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत मांडली.




