नांदेडमहाराष्ट्रव्हिडीओ

Himayatnagar News : हिमायतनगरात महावितरणच्या अनधिकृत कामकाजावर प्रशासनाची धडक कारवाई

हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यात HVDS 1×16 KVA रोहित्राच्या अनधिकृत बसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर महावितरण प्रशासनाने तात्काळ धडक कारवाई केली आहे. संबंधित रोहित्र तसेच विद्युत लाईनचे कंडक्टर काढून उपविभागीय कार्यालयात जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात जबाबदार धरलेल्या दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

या कारवाईबाबत महावितरणकडून देण्यात आलेले लेखी आश्वासनपत्र मिळाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, महविरचंद श्रीश्रीमाळ, नगरसेवक सुभाष बलपेलवाड यांच्या उपस्थितीत ७ फेब्रुवारी (शनिवार) रोजी अमरण उपोषण मागे घेण्यात आले.

या प्रकरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी ३ फेब्रुवारी २०२६ पासून हिमायतनगर उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले होते. सलग पाच दिवस चाललेल्या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेत ६ फेब्रुवारी २०२६ रोजी महावितरणचे वरिष्ठ व उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देत तक्रारदारांशी दोन ते तीन तास सविस्तर चर्चा केली. या बैठकीस स्थानिक प्रशासकीय अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.

प्राथमिक चौकशीत अनियमितता व सेवा नियमांचा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित HVDS रोहित्र काढून जप्त करण्यात आले. निष्काळजीपणा व नियमभंगप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर महावितरण सेवा नियमांनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चौकशीत आणखी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

IMG20260207153303 Himayatnagar News : हिमायतनगरात महावितरणच्या अनधिकृत कामकाजावर प्रशासनाची धडक कारवाई

दरम्यान, तक्रारदारांनी मांडलेल्या विद्युत लाईन दुरुस्ती, नवीन खांब उभारणी, लाईन स्थलांतर व तांत्रिक मंजुरी यासंबंधीच्या मागण्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमांनुसार टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असे महावितरणकडून लेखी स्वरूपात स्पष्ट करण्यात आले आहे. महावितरणकडून लेखी आश्वासन व तत्काळ कारवाई झाल्यानंतर वामनराव पाटील वडगावकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी अमरण उपोषण मागे घेतले. मात्र, एका महिन्यात अपेक्षित कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. यावेळी शहरातील नागरिक, शेतकरी, राजकीय पदाधिकारी व महावितरणचे कर्मचारी पत्रकार उपस्थित होते. 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!