नांदेड| गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने वैविध्यपूर्ण कामे केली आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही मागे होतो त्यामध्ये टॉप होण्यासाठी धडपड केली, नियोजन केले आणि कामांना गती दिली, हे सर्व यश माझे एकटीचे नसून तुम्हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामधूनच मिळवता आले, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केल
नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करनवाल यांना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्यावतीने आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात वर्षपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जल जिवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीप बनसोडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कार्यकारी अधियंता अे.आर. चितळे, एस.जी. गंगथडे आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, इथून पुढे आपणास कामाची गती वाढवायची असून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आता या प्रवासात सीटबेल्ट लावून ठेवावा, असे म्हणत आपणास लोकापेक्षा आणि लोकोपयोगी कामे पूर्ण करण्यासाठी गतीने पळणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या. याप्रसंगी डॉ. विलास ढवळे, मिलिंद व्यवहारे, शुभम तेलेवार व सुनिल अलुरकर यांनी संपादीत केलेल्या वर्षपूर्ती पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.संजय तुबाकले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी वर्षपूर्तीनिमित्त मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटना यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या वर्षपूर्ती कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात बुके, हार-तुरे पेक्षा त्यांनी शालेय साहित्य दान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांनी शैक्षणिक सहित्य भेट म्हणून त्यांना दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे नवी चालना मिळाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी होतकरु विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शालेय साहित्य दान करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत खाते प्रमुखांनी मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य दिले. यामध्ये 125 डझन वह्या, बॉलपेन 270, स्केचपेन- 300, कंपॉस बॉक्स 125, स्कुल बॅग-20, बुट- 20 जोड याशिवाय पेंसील बॉक्स, वॉटर कलर, कलर बॉक्स आदी शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात जिल्हा परिषदेच्या 20 विद्यार्थ्यांना सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना यांनी वर्षपूर्तीनिमित्त तामसा येथील जिल्हा परिषद शाळेस पन्नास खुर्च्या दिल्या आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रसारासाठी जिल्हा परिषदेची कटिबद्धता स्पष्ट झाली आहे. भविष्यात देखील अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची आशा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांनी व्यक्त केली आहे. सदर शैक्षणिक साहित्य सीईओ मीनल करनवाल ह्या दौ-या दरम्यान गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार आहेत.