नांदेड। प्रख्यात संगीतकार व गायक पं.र्हदयनाथ मंगेशकर यांच्या गितावर आधारीत र्हदयसंगम या कार्यक्रमाने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. जवळपास सहा हजार प्रेक्षकांनी त्यांच्या २२ गाण्यांचा मनमुराद आनंद लुटून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नांदेडच्या उदयोन्मुख कलावंतांनी एकापेक्षा एक सरस गाणी गावून हि पहाट बहारदार बनवली.
दिवाळी-पाडवा पहाट हा कार्यक्रम बंदाघाटवर सकाळी पावणेसहा वाजता सुरु झाला. निर्माते विजय जोशी व संकल्पना व निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाची निर्मिती झाली. संगीतकार प्रमोद देशपांडे यांनी या कार्यक्रमाचा खर्याअर्थाने पाया रचून गाण्यांची निवड केली. स्थानिक कलावंत व वादकांनी या कार्यक्रमाला साजेसे रुप आणले आणि पं.र्हदयनाथ मंगेशकर यांच्या गाजलेल्या २२ गितांचा सुरेल मिलाप बंदाघाटवर झाला. उदयोन्मुख गायिका समिक्षा चंद्रमोरे, कौशिकी चेतन पांडे, चैती दिक्षीत, अपूर्वा कुलकर्णी, प्रख्यात गायक नामदेव इंगळे, उदयोन्मुख गायक शुभम कांबळे यांनी गायिलेलेल्या विविध गितांनी पं.र्हदयनाथ मंगेशकर यांची गाजलेली गिते पूर्णतः ताकदीने सादर केल्याने रसिक, प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात वक्रतुंड महाकाय, ओम नमोजी आद्या, उठा उठा हो सकळीक, गगन सदन तेजोमय, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, नको देवराया, रुणूझूणु, रुणूझुणू रे भ्रमरा, तरुण आहे रात्र अजूनही, केंव्हा तरी पहाटे, ती गेली तेंव्हा पाऊस, भय इथले संपत नाही, चांदणे शिंपीत जाशी, मी मज हरपून बसले गं, लाजून हासणे अन, जिवा शिवाची बैलजोड, आला आला वारा, मी डोलकर डोलकर, गोमू संगतीन, शूर आम्ही सरदार, राजसा जवळी जरा बसा, जांभुळ पिकल्या झाडाखाली, सागरा प्राण तळमळला, किती जिवाला राखायच राखलं, आणि सरतेशेवटी निर्माते विजयी जोशी यांच्या मराठी पाऊल पडते पुढे या र्हदयनाथ मंगेशकर यांच्या दुर्मिळ आणि गाजलेल्या व संगीतबध्द केलेल्या रचनामुळे रसिकांनी अनेक गाण्यांना वन्समोर दिला. शेवटी निर्माते विजय जोशी यांनी संगीतकार र्हदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबध्द केलेले मराठी पाऊल पडते पुढे हे गीत खड्या आवाजात सादर करुन या कार्यक्रमाचा समारोप केला.
अॅड.गजानन पिंपरखेडे यांनी पं.र्हदयनाथ मंगेशकर यांच्या या गाण्यांच्या बाबत असलेल्या विविध आठवणी जाग्या करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमास वाद्यांची संगीतसाथ संगीत संयोजनात भरीव काम करणार्या सौ.अंजली दिक्षीत यांच्यासोबत राज लांबटिळे, स्वप्निल धुळे, भगवानराव देशमुख, रवीकुमार भद्रे, बाबा खंडागळे, रोहित बंसवाल यांनी साथसंगत केली. ढोलकीवर रवीकुमार भद्रे यांनी वाजवलेला तोडा अक्षरशः पंधरा मिनिटे रसिकांच्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. सर्वच वादकांची संगीतसाथ अगदी सुरेल होती. या कार्यक्रमास पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व कलावंतांचा गौरव करण्यात आला.
दरम्यान पं.र्हदयनाथ मंगेशकर यांची भेट घेण्यासाठी टिम र्हदयसंगम लवकरच जाणार असून, कार्यक्रमाचा अल्बम त्यांना देण्यात येणार आहे. यासाठी टिमचे सर्व सदस्य परिश्रम घेत असून, त्यांची तारीख घेवून त्यांचे आशिर्वाद घेण्याचा मनोदय अॅड.गजानन पिंपरखेडे यांनी व्यक्त केला.