हिमायतनगर, अनिल मादसवार| महिलांची आर्थिक स्थिती, आरोग्य व पोषणात सुधारणा व्हावी आणि त्यांची कुटुंबात निर्णायक भूमिका मजबूत बनावी यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेस्तही पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक थेट लाभ बॅंक खात्यात हस्तांतरण होऊन दरमहा पंधराशे रुपये रक्कम दिली जाणार आहे. यात पाच एकर शेतीची अट रद्द करून वयाची अट देखील 65 वर्षे केली आहे. या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक व्हावी आणि गावपातळीवर ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करून घ्यावी आणि त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले.
त्या हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयात दि.4 जुलै रोजी आयोजित तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमातून बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अतिरिक्त मु. का. अ. संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अमित राठोड, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, मु.ले.व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, उ.प.मु.अ.राजकुमार मुक्कावार, उ.प.मु.का.अ.मंजुषा कापसे, रेखा काळप, गटविकास अधिकारी सुधीर मांजरमकर, सहायक गटविकास अधिकारी पि.एम.जाधव आदींसह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी तहसील प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला होता.
यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांनी आपापल्या गावातील समस्या व तक्रारी मांडल्या. यात हिमायतनगर शहरातील उर्दू शाळेसह, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी उपस्थित करण्यात आल्या होत्या. तसेच तालुक्यातील मौजे वडगाव ज.येथील जिल्हा परिषद शाळेला वर्ग आठ शिक्षक एक अशी परिस्थिती आहे. यावरून शिक्षणाधिकारी यांना तक्रारदारांनी धारेवर धरले होते. तसेच तालुक्यातील वडगाव , कारला, वारंगटाकळी ,आंदेगाव, घारापुर, यासह अनेक गावच्या शाळेला शिक्षक नसल्यामुळे शिक्षणाधिकारी यांना तातडीने शिक्षण देण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या.
याबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामसेवक,आगंणवाडी ताई, आशा वर्कर यांनी पुढाकार घेऊन योजने बाबतीत लोकांपर्यंत माहिती पोहचवावी. आणि हिमायतनगर तालुका जिल्हात सर्वाधिक फार्म नोंदणी करून घ्यावी असे आवाहन केले. तसेच पंधरा वित्त आयोग निधी खर्च का झाला नाही, याचा जाब विचारात तातडीने मंजूर गावातील महत्वाचे कामं करण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी विस्तार अधिकारी टारपे, उप अभियंता हिरप, डॉ.सन्देश पोहरे, नालंदे, सुशील शिंदे, विशाल पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, प्रल्हाद पाटील, मारोती वाडेकर, सोपान बोंपीलवार, दयाळगिर गिरी, बाळू शिंदे, दत्ता पुपलवाड, यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी अधिकाऱी, कर्मचारी व तालुक्यातील सरपंच, सदस्य व तक्रारदार नागरिक व पत्रकार उपस्थित होते.