हिमायतनगर,अनिल मादसवार। पशुपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेत पशुपालन व्यवसायाचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे पशुपालन व दुग्धव्यसाय हा कृषीपूरक व्यवसाय न राहता तो शेती एवढाच मुख्य व्यवसाय म्हणून विकसित करणे आवश्यक झाले आहे. हि बाब लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाची रखडलेली पुनर्रचनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी महसूल, पशु संवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


पशुपालन व्यवसायात रोजगार निर्मिती व उद्योजकतेद्वारे पशुपालकांच्या आर्थिक स्थैर्यात वाढ करणे हे पशुसंवर्धन विभागाने उद्दिष्ट धेऊन विभागाची पुनर्रचना करण्यास मंत्रीमंडळात मान्यता देण्यात आली. पशुसंवर्धन विभाग पुनर्रचनामुळे अधिकाधिक पशुपालकाभिमुख केला असून त्यात मोठ्या प्रमाणात बदल केले आहे. या बदलांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी दर्जेदार सुविधा, औषधी, रोग निदानाच्या सुविधा, विविध योजना उपलब्ध होणारा असून जनावरांच्या आरोग्यावरील व व्यवस्थापना वरील तसेच कृत्रिम रेतनावरील खर्च कमी होऊन दूध उत्पादन वाढून दूध धंदा किफायतशीर होण्यास मदत होणार आहे. यातून नविन उद्योजक तयार होणार आहेत. पशुसंवर्धन विभागाची नवीन पुनर्रचना पशूंच्या आरोग्यासाठी व मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.


नवीन नवीन तंत्रज्ञान आणि पशु आहार व आरोग्य यांचे व्यवस्थापन यामध्ये जागतिक स्तरावर होणारे बदल पशुपालकांपर्यंत पोहोचून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त दुध उत्पादन करण्यासाठी, तसेच पशुपालकांच्या दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी तज्ञ मनुष्यबळ गावपातळीवर उपलब्ध असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीला पशुरोग निदानाच्या पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळेही पशुपालकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या युगात जिथे मानवी आरोग्य हे पशुंच्या आरोग्यावरती अवलंबून आहे व खुल्या बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा भावही जागतिक आयात निर्याती वरती अवलंबून आहे. त्यामुळे पशुपालकांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना पशुपालनाकडून उद्योजक निर्माती करण्यासठी पशुसंवर्धन विभागाची रखडलेली पुनर्रचनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.




