श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शेतकरी, कष्टकरी मजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी आक्रमकपणे लढणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या गोर सेनेची तालुक्यात काहीशी थंडावलेली चळवळ उर्जित करण्याच्या हेतूने गोर सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी काही फेरबदल केले असून माहूर तालुकाध्यक्ष पदी प्रफुल जाधव यांची पुनर्नियुक्ती करून माहूर तालुक्यातील गोर सेनेच्या नेतृवाची धुरा सोपविली आहे.


दि. ०१ जून रोजी नांदेड येथे संघटनेची महत्वपूर्ण बैठक संस्थापक अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोरसिकवाडी महारष्ट्र प्रदेश संयोजक प्रकाश पवार, गोरसिकवाडी चे जिल्हा सहसंयोजक प्रा.अमोल राठोड यांच्या हस्ते प्रफुल जाधव यांना माहूर तालुकाध्यक्ष पदी नियुक्तीचे पत्र दिले. प्रफुल जाधव हे धडाडीचे तरूण तडफदार कार्यकर्ते असून यापूर्वी त्यांनी माहूर तालुक्याच्या नेतृत्वाची धुरा तब्बल ११ वर्षे समर्थपणे सांभाळली, त्यादरम्यान संघटनात्मक कार्यास भर देऊन गोर सेनेच्या माध्यमातून माहूर तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी मजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या शासन प्रशासन व्यवस्थेशी संघर्ष करून सोडवणूक केली. त्यामुळे माहूर तालुक्यात गोर सेना अत्यंत नावारूपास आली.

दरम्यानच्या काळात संघटनात्मक बदल झाल्याने नव्या नेतृत्वाच्या काळात संघटनेच्या चळवळीत संथगती निर्माण झाली होती. या बाबीची दखल घेऊन संघटनेच्या वरिष्ठांनी प्रफुल जाधव यांची पुनर्नियुक्ती करून माहूर तालुक्यात उर्जा निर्माण करून दिल्याने अनेक कार्यकर्ते आनंदी झाले असून माहूर तालुक्यात पुन्हा गोरसेना आक्रमकपणे जनसामान्याच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्यास सज्ज झाल्याचे बोलल्या जात असून प्रफुल जाधव यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला असल्याने सर्वसामन्याच्या अडचणी व समस्या काय असतात आणि त्या प्रशासनाकडे पाठपुरावा करून कशा प्रकारे सोडवायच्या याचा मला चांगला अनुभव असल्याने संघटनेने माझ्यावर विश्वास टाकून पुन्हा संधी दिल्याबद्दल मी वरीष्ठ नेत्यांचा आभारी आहे. गोर सेनेचे संस्थापक प्रा.संदेश चव्हाण यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनात जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही गोर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली.
