नांदेड| यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती- पाणी पुरस्काराची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली असून नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून चव्हाण सेंटर मुंबई येथे सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २६ सप्टेंबर रोजी मुंबईत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील साहित्य क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे .


सुचिता खल्लाळ यांचे पायपोळ, तहहयात, प्रलयानंतरची तळटीप हे तीन काव्यसंग्रह, स्त्री कविचेचं भान : काल आणि आज (समीक्षा) आणि डिळी कादंबरी ही साहित्य संपदा प्रकाशित असून, त्यांच्या कवितेचा सदानिरा, वागर्थ (हिंदी मासिक), बेबाक (उर्दू मासिक) आणि हाकारा या वेब पोर्टलवर मराठी इंग्रजी भाषेतही अनुवाद प्रकाशित झाला आहे. त्यांच्या डिळी कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा ह ना आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्राप्त झाला आहे. डिळी ही कादंबरी हिंदी भाषेत (अनुवादित) लवकरच प्रकाशित होत आहे. त्यांना महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, संभाजी नगर, सावंतवाडी, इचलकरंजी, नागपूर, वर्धा येथील नामवंत साहित्य संस्थेचे पुरस्कार मिळाले आहेत.


साहित्य क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण काम करत योगदान देणाऱ्या साहित्य पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. नितीन रिंढे, शंभू पाटील, अजित भुरे, पत्रकार रमेश जाधव इत्यादी मान्यवरांच्या निवड समितीने हे पुरस्कारार्थी निवडले आहेत, असे त्या म्हणाल्या. राज्यभरातील साहित्य क्षेत्रांतून अनेक जणांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर हे पुरस्कारार्थी निवडले असून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाउंडेशनच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

या पुरस्काराबद्दल जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, देवीदास फुलारी, उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ, डॉ जगदीश कदम, नीळकंठ कदम, डॉ सुरेश सावंत, राम शेवडीकर, मनोज बोरगावकर, प्रा. राम जाधव, कल्पना जाधव, व्यंकटेश चौधरी, महेश मोरे, बापू दासरी, आनंदी मालेगावकर, अरुण अतनुरे, शिवा कांबळे, राम तरटे, मनोहर बसवंते, एकनाथ डुमने, प्र श्री जाधव आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


