नांदेड l विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचा प्रारंभ शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी नांदेड शहरातून काढण्यात आलेल्या भव्य साहित्य दिंडीने करण्यात आला. नांदेड शहरातील विविध शाळा, विशेषतः नाना पालकर प्राथमिक विद्यालय, राणी लक्ष्मीबाई हायस्कूल व ज्ञानभारती विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक यामध्ये सहभागी झाले होते. विविध शाळांच्या मुलांनी समाज सुधारकांचे विविध देखावे सादर केले होते.


तसेच वारकऱ्यांच्या वेषामधील विद्यार्थ्यांचे पथक ज्ञानोबा तुकाराम यांच्या अभंगाचा व समाजसुधारकांच्या वचनांचा जयघोष करत होते.ग्रंथदिंडी मधील चित्ररथामध्ये भारतमाता व संविधान ग्रंथ ठेवण्यात आला होता.



तसेच ग्रंथाच्या पालखीमध्ये विविध समाजसुधारकांनी लिहिलेले ग्रंथ ठेवण्यात आले होते.जातिवंत लोककलावंत, भटक्या विमुक्त जमातीतील समाज बांधव, वासुदेव, गोंधळी, जोशी, मशान जोगी, मसनजोगी ,नाथ जोगी,बहुरूपी मदारी या लोककलावंतांचा सहभाग होता. आतापर्यंत या समाजबांधवांना शासकीय संमेलनात सहभाग घेता आले नव्हते. पण आज भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना तथा भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती यांच्या माध्यमातून सर्व कलावंतांना सहभागी करून त्यांचा मानसन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.


शासन व संघटना मिळून यामध्ये सहभागी होत आहेत आपला भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तथा भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य सदस्य देविदास दिगंबर हादवे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

तत्पूर्वी शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या 16 समाजसुधारकांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. आयटीआय कॉर्नर येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला संमेलनाध्यक्ष पद्मश्री नामदेवराव कांबळे व समरसता साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.


