हिमायतनगर,अनिल मादसवार | येथील श्री परमेश्वराच्या यात्रेत धार्मिक कार्यक्रमानंतर आता विविध स्पर्धाना सुरुवात झाली असून, आज दिनांक ०६ गुरुवारी येथील यात्रेच्या मैदानात भव्य पशुप्रदर्शन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 61 शेतकऱ्यांनी आपल्या पशूंना प्रदर्शनात आणले होते. पुढील वर्षी याही पेक्षा जास्त पटीने बक्षिसे ठेऊन शेतकऱ्यांना चलन देण्याचे काम केले जाईल असे आश्वासन मंदिराचे सेक्रेटरी अनंतराव देवकते यांनी दिले. तसेच पशुपालकांना बक्षीस व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री परमेश्वर यात्रेत भव्य पशुप्रदर्शन संपन्न झाले आहे. परमेश्वर मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदर्शनातं पाणी टंचाईच्या काळात देखील शेकडो शेतकऱ्यांनी सहभागी होऊन उत्सुफुर्त प्रतिसाद दिला आहे. या पशुप्रदर्शनात 15 बैलजोड्या, 23 देशी वळू, 13 देशी कालवडी 10 देशी गाई अशा एकूण 61 पशूनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेत आलेल्या पशूंची तपासणी भोकर, किनवट येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने करून उत्कृष्ट पशूंची निवड करत शेतकऱ्यांचे नंबर काढले.

यात गावरान बैलजोडीमध्ये उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील शेतकरी माधव बाबाराव पवार या शेतकऱ्याच्या ढवळ्या पवळ्या बैलजोडीस अव्वल क्रमांकाचे बक्षीस व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे. द्वितीय क्रमांक मनोज रामलू टोकलवाड हिमायतनगर, तृतीय क्रमांक उमरखेड तालुक्यातील बोरी येथील विनायक दत्तराव माने, पवना येथील मोहनकुमार रामचंद्र गायकवाड, सरसम बु. येथील भीमराव रामराव आडबलवाड, याना प्रोत्सहानपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.

तर देशी वळू स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हनुमंत राजाराम जकेवाड देगाव, द्वितीय क्रमांक आकाश गुलाबसिंह चव्हाण हिमायतनगर, तृतीय क्रमांक अविनाश दिगंबर शिलेवाड सिरंजनी, तर आकाश सुरेश शिलेवाड, सीरंजनी, दत्तात्रय नागोराव जाधव जीरोना या दोघांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच देशी कालवड स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मण शिवाजी आचेमवाड, द्वितीय क्रमांक पुंडलिक भोजना नागुरवाड बोरगडी, तृतीय क्रमांक दिगंबर बाबुराव लुम्दे हिमायतनगर, आणि देशी गाई स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बालाजी मारोती हंगरगे वडगाव, द्वितीय क्रमांक बालाजी गंगाराम वानखेडे पळसपुर, सद्गुण सुभाष जाधव रमणवाडी यांना मिळाला आहे. यावेळी मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंता देवकते, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष शिंदे, संचालक शांतीलाल सेठ, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, पिंटू चिंतावार, संतोष गाजेवार, अशोक अनगुलवार आदींसह पशुधन विकास अधिकारी, गावकरी, शेतकरी, पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
