Hind di chadar : ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम जागतिक व्यासपीठावर नेण्याचे आवाहन

FB IMG 1768912642135 Hind di chadar : ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम जागतिक व्यासपीठावर नेण्याचे आवाहन

नांदेड, अनिल मादसवार| ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम केवळ नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावा, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने, काटेकोर नियोजनासह जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या भव्य शहीदी समागम कार्यक्रमाच्या तयारीचा सविस्तर आढावा राज्यमंत्री मिसाळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. या बैठकीस संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, विभागीय माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, भाविकांसाठी पुरेसे पिण्याचे पाणी, स्वच्छ व सुसज्ज शौचालये, वैद्यकीय सुविधा आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाची प्रचार–प्रसिद्धी केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी, यासाठी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा. स्थानिक लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभागही आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

FB IMG 1768912651256 Hind di chadar : ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम जागतिक व्यासपीठावर नेण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व त्यागाची प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी शाळा स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सिनेमागृहांमध्ये भक्तिगीत प्रसारित करणे, प्रत्येक जिल्ह्यात होर्डिंग्जद्वारे कार्यक्रमाचा संदेश पोहोचवणे, हे उपक्रमही प्रभावी ठरतील, असे त्यांनी सांगितले. महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांना कार्यक्रमस्थळी सहज सहभाग घेता यावा, यासाठी पार्किंगपासून मुख्य कार्यक्रमस्थळापर्यंत विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रशासन सज्ज, तयारी अंतिम टप्प्यात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहिती दिली की, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमधील असरजन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५२ एकर मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री, संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत.

FB IMG 1768912645558 Hind di chadar : ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम जागतिक व्यासपीठावर नेण्याचे आवाहन

कार्यक्रमस्थळी युद्धपातळीवर काम सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, दोन भव्य टेन्ट सिटी, प्रत्येकी हजारो भाविकांची निवास क्षमता, तसेच शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता, स्वयंसेवक, मोफत सेवा स्टॉल्स आणि ५० हजार नेत्र तपासणीसह विशेष कर्करोग तपासणी शिबिरे उभारली जाणार आहेत.

सुमारे १० लाख भाविकांसाठी भव्य लंगर व्यवस्था, आरोग्य, सुरक्षा, वाहतूक आणि निवास याबाबत सर्व विभाग समन्वयाने काम करत असल्याचे जिल्हाधिकारी कर्डिले यांनी स्पष्ट केले. ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम हा श्रद्धा, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top