हदगाव, शेख चांदपाशा| अखिल विश्वाला शांततेचा मार्ग दाखविणारे शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जयंतीनिमित्त हदगाव शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या निमित्ताने मिलाद कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन दि. ८ सप्टेंबर रोजी जुना बस स्टँड येथे करण्यात आले होते.


सदरील शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपाधीक्षक दगडू हाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे, कमिटीचे पदाधिकारी तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप आणि लहान मुलांसाठी जेवणाचेही आयोजन करण्यात आले.रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ८६ दात्यांनी रक्तदान केले, अशी माहिती आयोजकांनी दिली. रक्त संकलनासाठी गुरुगोविंद सिंगजी ब्लड सेंटर नांदेड यांचे सहकार्य लाभले.


हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ते न्यायप्रिय शासक, योद्धा, प्रभावी वक्ते, प्रमाणिक व्यापारी, स्त्री उद्धारक, गुलामांचे मुक्तिदाता आणि समाज सुधारक होते. त्यांच्या जयंतीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या जुलूस शांततेच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. लहान मुलांचा उत्साह यावेळी विशेष पाहायला मिळाला.


रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक फिरोज खान पठाण, शेख बशीर, शेख खाजा, जमीर खान पठाण, शेख जुनेद पत्रकार, बबलू पटेल, शेख सद्दाम, शेख अझहर यांनी विशेष परिश्रम घेतले. तर शेख कलीम, अनवर खान, शेख युसुफ, शेख रशीद, साजिद टेलर यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांततेत जुलूस पार पाडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व पोलीस उपाधीक्षक दगडू हाके यांनी शहरात स्वतः उपस्थित राहून पाहणी केली.




