बिलोली। चुलत बहिणी सोबत कानातील पितळेच्या काड्या काढून सोन्याच्या काड्या घालण्यासाठी बिलोली शहरातील सुवर्णकार ज्वेलर्स येथे गेलेल्या एका अल्पवयीन ग्राहक मुलीचा विनयभंग करणा-या गजानन रत्नपारखी यास बिलोली येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ तथा अति. सत्र न्यायाधीश वि. ब बोहरा यांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी ३ वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दि. २५/०८/२०२२ रोजी सदर घटनेतील पिडीत व तिची चुलत बहीण सायंकाळी ५-३० वाजताच्या सुमारास बिलोली शहरातील गजानन रत्नपारखी यांच्या सुवर्णकार ज्वेलर्स येथे गेले असता दुकानात गर्दी होती. काही वेळाने सर्व ग्राहक निघून गेल्यावर आरोपीने पिडीतेच्या कानातील पितळेच्या काड्या काढल्या. पितळेच्या काड्या काढल्या नंतर पिडीतेच्या कानातून पु येत असल्यामुळे आताच सोन्याचे काड्या घालता येणार नाही काही दिवस लिंबाच्या काड्या घालाव्या लागतील असे सांगितले. त्यामुळे पिडीतेची बहीण लिंबाच्या काड्या आणण्यासाठी गेली. तेव्हा दुकानात पिडीता व आरोपी हे दोघेच दुकानात असल्याचे पाहून आरोपीने पिडीतेचा विनय भंग केला.
तेवढ्यात पिडीतेची बहीण दुकानात आलेली पाहून आरोपीने पिडीतेला सोडून दिले. त्यानंतर पिडीता व तिची बहीण दोघे घरी जाऊन झालेला प्रकार मावशीला सांगितला. त्यानंतर पिडीता व तिची मावशी यांनी बिलोली पोलिस स्टेशन येथे जाऊन दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे येथे गुन्हा क्र. १९२/ २०२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करुन बिलोली पोलीसांनी जिल्हा व अति सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकार तर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालया समोर आलेल्या साक्षी पुराव्यांचा विचार करुन बिलोली येथे तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ तथा अति. सत्र न्यायाधीश वि. ब बोहरा यांनी आरोपी गजानन अनंतराव रत्नपारखी रा. कासराळी, ह मु. लोहार गल्ली बिलोली यास कलम ३५४- अ भादवी कलम ८ पोक्सो अंतर्गत दोषी ठरवून ३ वर्षं सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार तर्फे सहाय्यक अभियोक्ता संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. तर पैरवी अधिकारी शेख महेबुब यांनी सहकार्य केले.