किनवट, परमेश्वर पेशवे| सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तकांचा किनवट तालुका विजयी मेळावा साईबाबा संस्थान येथे दि.१९ ऑक्टोबर रोजी उत्सहात संपन्न झाला.
आरोग्य विभागाचा कणा तसेच अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांना मानधन देण्याऐवजी त्यांना किमान वेतन देण्यात यावे व शासकीय सेवेत समायोजन करावे ह्या मागणीसाठी सीटूच्या झेंड्याखाली सातत्याने संघर्ष सुरु आहे. त्यास यश मिळत असून अलीकडे राज्य शासनाकडून दहा हजार रुपये वाढ मिळवून घेण्यात सीटू संघटनेस यश मिळाले आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सीटू सलग्न आशा व गटप्रवर्तकांचे तालुकास्तरीय मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.
त्या धरतीवर किनवट तालुका मेळावा काल घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार ह्या तर प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशनचे सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षणाची जननी माता सावित्री फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
यावेळी किनवट तालुका कमिटीच्या वतीने कॉ.उज्वला पडलवार यांच्यावर पुष्पवृष्टी करीत त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कॉ.उज्वला यांचा देशाच्या महामहीम राष्ट्र्पती यांच्या हस्ते सन्मान झाल्यामुळे त्यांच्या सत्काराचे आयोजन जिल्हाभर तालुका निहाय मेळाव्यात करण्यात येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के. पी.गायकवाड,बीएनओ श्रीमती बनसोडे मॅडम, सुधाकर भुरे कॉ.अर्जुन आडे, फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षा शिलाताई ठाकूर, जिल्हा पदाधिकारी निर्मलाताई शिनगारे,तालुका अध्यक्षा सुनीता पाटील,गंगासागर पडलवार, विद्याबाई मोदूकवार,कॉ.स्टॅलिन आडे, कॉ.जनार्धन काळे आदींचा सन्मान करण्यात आला.
मेळाव्याचे उदघाटन किनवट तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी.गायकवाड यांनी केले. सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मेळाव्यास संबोधित केले. मेळाव्यास तालुक्यातील आशा, गटप्रर्वत्तक मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या. यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना कॉ.उज्वला पडलवार म्हणाल्या की , सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या लढ्याला यश आले असून सातत्यपूर्ण आंदोलनामुळे आशाना दहा हजार रुपये मानधनात वाढ झाली आहे.
यासाठी १२ फेब्रुवारी ते १ मार्च असे २३ दिवस मुंबई येथे अखंड आंदोलनमुंबईच्या आझाद मैदानावर करण्यात आले. लढल्याने जिंकता येते हा इतिहास असल्यामुळे सीटू कामगार संघटनेचा इतिहासावर विश्वास आहे. म्हणून अनेक यशस्वी लढे देऊन कामगारांचे प्रश्न सोडविलेले आहेत असेही त्या म्हणाल्या. यावेळी सूत्रसंचालन सुनीता पाटील तर प्रास्ताविक निर्मला शिनगारे यांनी केले. विजयी मेळावा यशस्वी करण्यासाठी शिल्पा राठोड, शोभाताई सानप, ललिता काळे, अर्चना कंधारे,सारिका डोंगरे माधवी रेडिवार, वैशाली मुनेश्वर,संध्या पैठने, रंगु खंदारे,वंदना पेंदोर,कल्पना वानोळे, निर्मला राठोड आदींनी परिश्रम घेतले. कॉ.अर्जुन आडे यांनी मेळाव्यास शुभेच्छा देत जोरदार भाषण केले. आणि सरकारवर घणाघाती हल्ला चढवीला.