किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ दिनांक 7 रोजी किनवट येथील जाहीर सभेत बोलत असताना या मतदारसंघात होऊ घातलेल्या चिमटा धरण या प्रकल्पात 95 गावी ही बुडीत क्षेत्रात जात असल्याचा आरोप विरोधकाकडून होत असल्याने त्यापैकी एकही गाव हे मी विस्थापित होऊ देणार नाही बुडीत क्षेत्रात येऊ देणार नाही कारण मी स्वतः पाटबंधारे मंत्री असल्याने एकाही शेतकऱ्यांची नुकसान होऊ देणार नाही. अशा स्वरूपाची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसमुदायाला संबोधित करताना दिली.
त्याचबरोबर लाडक्या बहिणी संदर्भात सावत्र भावापासून सावध रहा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लाडकी बहीण योजना बंद करण्यात यावी यासाठी आघाडीच्याच लोकांनी हायकोर्टात धाव घेतली असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. पण हायकोर्टाने त्यांच्या या मागणीला दुजोरा दिला नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर किनवट तालुक्यातील विविध विकास कामाचा प्रश्न त्याचबरोबर बहुतांशी सिंचन प्रकल्प आदिवासी शाळा रस्ते मजबुतीकरण हे आमदार भीमराव केराम यांच्या माध्यमातून मार्गी लागली असून पुन्हा राज्यात भाजपाचे सरकार आले तर विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली.
याच व्यासपीठावर बोलत असताना विधानसभेच्या निवडणुकीचा धसका घेत अखेर आमदार भीमराव केराम यांनी किनवट जिल्हा निर्मिती करावा इस्लापूर मांडवी ही तालुके घोषित करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. व्यासपीठावर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसह किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .