उस्माननगर, माणिक भिसे| वाका ता.लोहा येथील भूमीपुत्र तथा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात पुणे एअरपोर्ट लोहगाव येथे कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक रघुनाथ भुजंगा वन्ने (वय ५३) हे कर्तव्यावर असताना अकाली मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात वाका येथे शुक्रवारी (दि.२७) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय औद्योगिक बलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिवंगत वन्नेंना मानवंदना दिली. यावेळी अंत्यसंस्कारासाठी परिसरातील नागरिक उपस्थित होते..
वाका येथील भूमिपुत्र रघुनाथ भुजंगा वन्ने (वय ५३) यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वाका व कापसी गुंफा ता. लोहा येथे झाले . सन १९९२ यावर्षी ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात त्यांची शिपाई म्हणून नेमणूक झाली. त्यांनी टाटानगर, गुजरात, मुंबई, जेएनपीटीसह विविध ठिकाणी कर्तव्य बजावले पुढे त्यांची पदोन्नती सहाय्यक उपनिरीक्षक पदावर झाली .ते पुणे एअरपोर्ट लोहगाव येथे कार्यरत होते. मात्र त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले उलट्या झाल्या. त्यातच गुरुवारी (दि.२६) दुपारी रघुनाथ वन्ने यांचा पुणे येथे दुर्दैवी मृत्यू झाला.
यानंतर यांचे पार्थिव एअर अंबुलन्समधून शवपेटीत ठेवून त्यांच्या जन्मगावी वाका येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजता पार्थिव आणण्यात आले .त्यांच्या पार्थिवदेह तिरंग्यात गुंडाळून ठेवलेला पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक, गावकरी व पंचक्रोशीतील नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. सीआयएसएफचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवंगत शहीद रघुनाथ वन्ने यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. पुत्र विशाल वन्ने, महान वन्ने यांनी भडाग्नी दिला. पत्नी कमलाबाई वन्ने, मुलगी भाग्यश्री शशिकांत गौतम व नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते.
सीआयएसएफचे उपनिरीक्षक कार्यपालक शरण सिंग, सहाय्यक उपनिरीक्षक यु.टी.मोटे, किरण माने मुख्य आरक्षक हवालदार, पी.के. पंडित, एम सुनील, पि.के. शर्मा, सुधीर पाटील, आरक्षक शिपाई यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी येथील उस्माननगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर , पोलीस कॉन्स्टेबल माधव पवार, सरपंच प्रकाश वन्ने, शशिकांत गौतम व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित होते. यावेळी अमर रहे.. अमर रहे… रघुनाथ वन्ने अमर रहे…च्या घोषणा देण्यात आल्या. शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले