नांदेड| राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत स्वच्छता हा महत्त्वाचा विषय असून शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये व्यापक स्वच्छता मोहिमेला सुरुवात (cleanliness drive in all the offices) करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावर यांची उपस्थिती होती.

या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालये व परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेमुळे कर्मचार्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून, स्वच्छता ही केवळ कर्मचाऱ्यांची नव्हे, तर सर्वांची जबाबदारी असल्याचा संदेश दिला गेला आहे. सर्व कार्यालयात स्वच्छतेचा उपक्रम सातत्याने राबविणे ही आपली जबाबदारी आहे. अधिकारी व कर्मचारी यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास हा उपक्रम यशस्वी होईल, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केले.

तालुका स्तरावरील सहभाग
राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या सात कलमी कार्यक्रमातील स्वच्छता उपक्रमाला जिल्ह्यातील तालुका स्तरावरही मोठा प्रतिसाद मिळाला. पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत आदींमध्ये ही मोहिम राबवण्यात आली. गट विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या मोहिमेदरम्यान कार्यालयांमधील टेबल-खुर्च्यांची सफाई, कपाटांतील फाईल्सचे वर्गीकरण, तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमामुळे जिल्ह्यात स्वच्छता उपक्रमाला नवी दिशा व गती मिळाल्याचे दिसून आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला आहे.
