हदगाव| तालुक्यातील मौजे बोरगाव येथे एका लग्न सोहळ्याचा मंडप टाकण्याचे काम सुरु असतांना विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. हि घटना दिनांक १९ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली असून, गावात शोककळा पसरली आहे.

सर्वत्र लग्नसराची धामधूम सुरु आहे, त्यामुळे गावागावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशाच आनंदावर विरजण टाकणारे घटना हदगाव तालुक्यातील मौजे बोरगाव येथे घडली असून, मौजे बोरगाव येथे दि. २० एप्रिल रोजी दोन विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते. या लग्न सोहळ्याची गावात तयारी सुरू असल्याने दिनांक १९ रोजी रात्री गावातील तरुण मदतीसाठी आले होते. गावातील काही युवक हळदीच्या दिवशी मंडप टाकण्याचे काम करीत होते. दरम्यान अचानक वारे आल्याने मंडपाच्या वरून जाणाऱ्या विद्युत तारेला मंडपाच्या खांबाचा अनावधानाने स्पर्श झाला.

यावेळी विजेचा जोरदार शॉक बसून पांडुरंग भट्टेवाड व साईनाथ भट्टेवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक तरुण होते, सुदैवाने ते पाणी आणण्यासाठी गेल्याने थोडक्यात बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. दरम्यान दोन्ही तरूणांचे मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. या घटनेने हदगाव तालुक्यातील बोरगाववर शोककळा पसरली.


गावात गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत तारा लोंबकळत असल्यांने गावकऱ्यांनी अनेक वेळा महावितरण कंपनीकडे तक्रार केली होती. परंतु महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाला असा आरोप घटनेनंतर गावकऱ्यांनी केला आहे. संबंधित महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. यामुळे गावात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.


