उमरी/नांदेड। गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेसह सोबत असलेल्या २ मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुदैर्वी घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील मौजे भायेगाव येथे शनिवारी दिनांक 06 रोजी दुपारी घडली. काही तासाच्या शोध मोहिमेनंतर स्थानिक नागरिकांनी तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.


उमरी तालुक्यातील भायेगाव येथील गावाजवळ असलेल्या गोदावरी नदीपात्रात गावातील अनेक महिला कपडे धुण्यासाठी जातात. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास गावातील महिला महानंदावाई भगवान हनमंते वय ३४, पायल भगवान हनमंते वय १४ या माय लेकीसह ऐश्वर्या मालु हणमंते वय १३ या तिघी कपडे धुण्यासाठी नदी पात्रात गेल्या होत्या.

यावेळी पायल पाण्यात पाय घसरुन पडल्याने ती पाण्यात बुडत होती. तिला वाचविण्यासाठी आई महानंदा पाण्यात उतरली, या माय लेकी पाण्यात बुडतांना पाहून सोबत असलेल्या ऐश्वर्याने आरड ओरड करत पाण्यामध्ये उडी मारली. परंतू यातील कोणालाही पोहता येत नसल्याने तिघीही पाण्यात बुडाल्या. यावेळी उपस्थित महिलांनी आरड ओरड करून घटनेची माहिती अन्य नागरिकांना दिली. कांही वेळानंतर गावातील नागरीकांनी टोकऱ्याच्या सहाय्याने पाण्यात उतरून शोध घेत

मृतदेह पाण्याबाहेर काढले. घटनेचे गांभीर्य घेवून लक्षात उमरीचे पोलिस निरीक्षक माने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. नदीकाठी शेवाळ चढल्यामुळे सर्वप्रथम मुलीचा सुरुवातीला पाय घसरला व जवळपास २० फुट खोल असलेल्या पाण्यात बुडाली. तिला वाचविण्यासाठी आईने भरपुर धडपड केली परंतू पोहता येत नसल्याने तिचाही पाण्यात बडन मत्य झाला, सोबत असलेल्या ऐश्वर्याचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भायेगावात हळहळ व्यक्त होत आहे. या तिघींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहेत. या घटनेबाबत उमरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया वृत्त प्रकाशित होईपर्यंत सुरु होती.
